आठवडी बाजारात दगडांची मापे!

Weighing
Weighing

नागपूर - शहरातील अनेक आठवडी बाजारात दगडी मापे वापरून ग्राहकांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. एक किलो भाजीपाला घेतल्यानंतर त्याचे डिजिटल मशीनवर मोजमाप केल्यास ते केवळ ७५० ते ८०० ग्रॅम भरतो. अशा प्रकाराकडे वजनमापे विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा फटका बसत असून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

किरकोळ व्यापाऱ्यांसह विक्रेत्यांनी ते वापरत असलेली वजने दर दोन वर्षांनी प्रमाणित करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक व्यापारी नियमाप्रमाणे वागत नाहीत. तसेच प्रशासनांकडून याविषयी चौकशी होत नाही. 

एकाद्यावेळी चौकशीला कुणी आलेच तर वजनमापे प्रमाणित करण्यापेक्षा हात ‘ओले’ करून मोकळे होतात, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. अनेक वर्षापासून वजनमापे वापरून जीर्ण झाल्याने त्यांची झीज होवून वजनही कमी होते. परिणामी कमी मापाची वस्तू ग्राहकाच्या माथी मारली जाते. त्यामुळे ग्राहक एक किलोचे पैसे जरी देत असला तरी त्याला त्यापेक्षा कमी वजनाची वस्तू मिळते. अनेकदा वस्तूच्या मोजमापासाठी बटाटे, कांदा, दगड, विटाचा वापर करताना दिसून येतात. या वस्तू प्लॅस्टिक कागदात गुंडाळून त्याचा वजनमापे म्हणून वापर केला जातो. 

माल तोलाईत हातसफाई ही तर विक्रेत्यांची कला आहे. कोणत्याही वस्तू मोजमाप होत असताना ग्राहकाचे लक्ष पारड्यार असते. हीच संधी साधून वजन करणारा हाताला ज्या पारड्यात वस्तू ठेवतात त्या बाजूला झुकवून कमी वजनाची वस्तू ग्राहकांच्या पदरात टाकतो. बाजारात डुप्लिकेट वजनमापे विकत मिळतात. वजनावर एक किलो असे नमूद असते परंतु प्रत्यक्षात त्याचे वजन ८००, ८५०, ९०० ग्रॅमच असते. 

‘काटा मारावाच लागतो..!’
अधिक नफा मिळावा यासाठी कमी वजनात वस्तू विकाव्या लागतात. महागाई पाहता ग्राहकसुद्धा भाव पाहून कुरबूर करतो. त्यामुळे काटा मारावाच लागतो, अशी प्रतिक्रिया तुकडोजी चौकाजवळ असलेल्या शुक्रवारी बाजारातील एका भाजीपाला विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

फळविक्रेत्यांकडे दोन-दोन वजने 
अनेक फळविक्रेत्यांकडे किलोचे दोन-दोन वजने असतात. जर एखादा ग्राहक मोल-भाव करीत असल्यास त्याला कमी असलेल्या वजनाने मोजून दिले जाते. केळी, संत्री, चिकू विक्रेते खराब झालेले फळ वजनाजवळ ठेवतात. कमी पडल्यास लगेच सडके फळ पारड्यात टाकतात. अशा प्रकाराने ग्राहकाची दुहेरी फसवणूक करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com