दिवाळीसाठी घरी परतू इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा, धावणार स्पेशल ट्रेन

योगेश बरवड
Tuesday, 20 October 2020

०१२३५ नागपूर-मडगाव स्पेशल ट्रेन २३ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी दुपारी ४ वाजता नागपूर स्टेशनहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी ४.४० वाजता मडगावला पोहोचेल.

नागपूर  ः अनलॉक प्रक्रियेंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्रे खुली केली जात आहेत. रेल्वेही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचे संकट ओसरत असल्याची सकारात्मक चिन्हेही दिसत आहेत. अशावेळी रेल्वेने गोवा वारीसाठी नागपूरहून साप्ताहिक स्पेशल ट्रेन चालविण्याचे नियोजन केले आहे. पण, प्राथमिक नियोजनानुसार दिवाळीपूर्वीच गोवा वारी आटोपावी लागणार आहे.

०१२३५ नागपूर-मडगाव स्पेशल ट्रेन २३ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी दुपारी ४ वाजता नागपूर स्टेशनहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी ४.४० वाजता मडगावला पोहोचेल. तसेच ०१२३६ मडगाव -नागपूर विशेष रेल्वे प्रत्येक शनिवारी सायंकाळी ७.४० वाजता परतीच्या प्रवासाला निघेल आणि रविवारी रात्री ८.३० वाजता नागपूरला पोहोचेल. 

अधिक माहितीसाठी - Video : हृदयाला फुटले पाझर; जेव्हा विधवा म्हणाली, ‘घरचा कर्ता पुरुष गेल्यावर जगायच कसं’
 

एकूण २२ डबे असणाऱ्या या गाडीला एक द्वितीय श्रेणी व ४ तृतीय श्रेणी, ११ स्लिपर व ४ सामान्य डबे राहतील. नागपूर विभागातील वर्धा, बडनेरा, अकोला तसेच भुसावळ स्थानकावर थांबा राहील. गोवा मार्गावरील प्रवाशांसाठीही ही गाडी उपयुक्त ठरेल. प्रामुख्याने दिवाळीदरम्यान घरी परतू इच्छिणाऱ्यांना या गाडीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 

रेल्वेच्या अन्य गाड्यांप्रमाणेच या गाडीसाठी नियमावली राहील. केवळ कनफर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश मिळेल. मास्क बंधनकारक राहील आणि रेल्वे प्रवासादरम्यान भौतिक अंतर राखावे लागणार आहे.

नागपूरहून गोव्यासाठी नियमित रेल्वे चालविण्याची जुनी मागणी आहे. ही मागणी पूर्णत्वास येऊ शकली नसली तरी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडून स्पेशल ट्रेन चालविली जाते. गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता प्रवासी हंगामत या गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढही केली जाते. गोवा ट्रेनची वारंवारिता लक्षात घेता ती नियमित करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस असल्याचे भासते. 

संपादित - अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly special train from Nagpur to Goa