esakal | दिग्रस येथे पोलिस व कृषी विभागाच्या धाडीत आढळले ते काय.... 
sakal

बोलून बातमी शोधा

duplicate fertilizer

या मालवाहू बसमध्ये बोगस विनापरवाना, एनपीकेचे कुठेही नमूद नसलेले, तसेच विनाबॅच असलेले डीएपी खत असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना मिळाली होती.

दिग्रस येथे पोलिस व कृषी विभागाच्या धाडीत आढळले ते काय.... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : मालवाहू बसमधून वाहतूक केल्या जात असलेल्या डीएपी या बनावट खताच्या दोनशे बॅग कृषी विभाग व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आल्या. ही कारवाई शनिवारी (ता. 20) सकाळी दहा वाजताच्या दरम्यान करण्यात आली. याप्रकरणी दिग्रस पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

देसाईगंज (वळसा, जि. गडचिरोली) येथून ब्रम्हपुरी (ता. चंद्रपूर) आगाराच्या एसटी मालवाहू बसने शुक्रवारी (ता.19) सायंकाळी 5 वाजता दोनशे बॅग भरलेला बनावट खताचा माल दिग्रस तालुक्‍यातील तिवरी येथील बावणे कृषी केंद्र येथे शनिवारी (ता.20) सकाळी 10 वाजता पोहोचवला. या मालवाहू बसमध्ये बोगस विनापरवाना, एनपीकेचे कुठेही नमूद नसलेले, तसेच विनाबॅच असलेले डीएपी खत असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुकास्तरीय पथकाने बावणे कृषी केंद्र तिवरी येथे येऊन मालवाहू बसची (एम एच 31 एम 9011) तपासणी केली. त्या बसमध्ये 200 बॅग हर्ष डीएपी खताचे पोते आढळून आले.

कंपनीच्या चौकशीसाठी पथक हैदराबादला रवाना

जागेवर पंचनामा व प्राथमिक कारवाई करून पुढील कारवाईसाठी मालवाहू बस खतासह दिग्रस पोलिस स्टेशनला आणण्यात आली. डीएपी विक्री परवाना नसताना विनापरवाना हैदराबाद येथील हर्ष डीएपी बनावट खताचा पुरवठा करताना जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरीय समितीने धाड टाकून ही कारवाई केली आहे. यामध्ये माल ऑर्डर करणारे बावणे कृषी केंद्र तिवरीचे संचालक व मालपुरवठा ऑर्डर घेणारे सिद्धार्थ गोवर्धन सोनुने चिखली, ता. दारव्हा यांच्याविरुद्ध दिग्रस पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यात आली आहे. तसेच हैदराबाद येथील हर्ष फर्टिलायझर कंपनीच्या चौकशीसाठी पथक पाठविण्यात आले असून अजून बोगस खत विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश होणार असल्याचे पथकामार्फत सांगण्यात आले. 

अवश्य वाचा- ...तर ताडोबातील  वाघांचे अस्तित्व येणार धोक्यात! हे आहे कारण...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांच्या मार्गदर्शनात झालेली ही कारवाई जिल्हा कृषी विकास अधिकारी पंकज बर्डे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक दत्तात्रेय आवारे, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद राहुल डाखोरे, सहायक परवाना अधिकारी मोरेश्‍वर अंबडवार, दिग्रसचे तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव व पंचायत समिती कृषी अधिकारी प्रमोद बागडे यांनी पार पाडून दिग्रस पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले व दिग्रस पोलिस करीत आहेत.