काय झाले असे की सर्वच नेते झाले खुश?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

-जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक

-खुल्या गटाच्या अध्यक्षपदाने इच्छुकांत रस्सीखेच
 

र्गोदिया : बऱ्याच वर्षानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदाच्या आरक्षण सोडतीत सर्वसाधारणकडे (खुला) गेले आहे. त्यामुळे मिनीमंत्रालयाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचे कोण्या एकाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी मात्र, इच्छुकांमध्ये रस्साखेचही पाहायला मिळेल. पक्षांतर्गत गटबाजीदेखील यानिमित्त पुढे येईल, हे तेवढेच खरे आहे. 53 सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कधी ओबीसी जनरल, कधी ओबीसी महिला, तर कधी अनुसूचित जमाती महिलांकरिता राखीव होते. बऱ्याच वर्षांपासून हे चालले आहे. परंतु, यंदाच्या आरक्षण सोडतीने राखीव पदावर पाणी सोडले आहे. जून 2020 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे.

अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा
निवडणुकीला जवळपास सात महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या निवडणुकीकरिता मोर्चेबांधणीला जबरदस्त सुरुवात केली आहे. यंदाही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव असेल, असा समज राजकीय पुढाऱ्यांचा होता. मात्र, हे पद आता खुले झाल्याने इच्छुक या पदासाठी उड्या मारतील. हे निश्‍चित मानले जात आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उतरलेल्या अन्‌ स्वप्नभंग झालेल्या पराभूत उमेदवारांचा डोळाही या पदाकडे असेल, असे बोलले जाते.

मनधरणीकडेही उमेदवारांचा कल

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीची लॉटरी आपल्यालाच लागावी, यासाठी वजनदार नेत्यांच्या मनधरणीकडेही अशा उमेदवारांचा कल अधिक राहणार आहे. मातब्बर नेतेही ज्येष्ठ नेत्यांना पायघड्या घालतील, हे तितकेच खरे आहे. अशातच मिनीमंत्रालयाच्या खुर्चीत बसण्याचे स्वप्न असूनही पक्षाने उमेदवारी नाकारल्यास गटबाजीदेखील उफाळून येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दरम्यान, बहुप्रतीक्षेनंतर पहिल्यांदा अध्यक्षपदाचे आरक्षण खुले झाल्याने हवशा, गवशा, नवशांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

आता 53 जागांवर डोळा
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारणकरिता (खुला) गेले आहे. त्यातही जिल्हा परिषद सदस्यांच्या 53 जागांपैकी कोणत्या जागा राखीव अन्‌ कोणत्या खुल्या असतात, याकडे आता इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.

15 जुलैला नवा गडी, नवा राज
जून 2020 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. सध्याच्या विद्यमान अध्यक्ष सीमा मडावी यांचा कार्यकाळ 15 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेला नवा गडी मिळेल, तिथूनच नवा राज सुरू होईल. अध्यक्षपद खुले झाल्याने आता गणिताच्या आकडेमोडीला दमदार सुरुवात होईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened that made all the leaders happy?