अरे, हे कसले बालोद्यान? ही तर "पोट्‌टेशाही'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

  • मोवाडवासींसाठी उद्यानाचा विकास दहा वर्षांपासून थंडबस्त्यात
  • सुविधांचा अभाव
  • सभोवताली तारेचे केवळ कुंपण
  • शासन प्रशासनाचे दुर्लक्ष

मोवाड (जि.नागपूर) ः नरखेड परिवहन मार्गाच्या अगदी बाजूला तसेच गावाच्या मध्यभागी असलेले येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र. ते शासनाने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी खुले केले आहे. मात्र, दहा वर्षांपासून केवळ तारांच्या कुंपणाने बांधण्यात आलेल्या या उद्यानात ना बसण्याची सोय ना फिरण्याची मोकळीक. सुविधांचा अभाव असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये शासन प्रशासनाबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. मोवाडनगरीत बालोद्यानाच्या नावाने केवळ "पोट्‌टेशाही' सुरू असल्याचा भास होतो.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील उद्यानच सलग दहा वर्षांपासून आजारी असल्याने ते बांधकाम आता थंडबस्त्यात असून ते नागरिकांसाठी आता केवळ "पांढरा हत्ती ठरत आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी मोवाड परिसरातून होत आहे. मोवाडसह खैरगाव, देवळी, देवग्राम, पोरगव्हाण, बेलोना, माणिकवाडा, भायवाडी, गोधनी, गायमुख, पांढरीसह 23 गावांच्या ग्रामीण तसेच गरीब व निराधार असलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी हे रुग्णालय बांधण्यात आले. त्यांच्या नातेवाइकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी उद्यान निर्माण करण्यात आले. परंतु, उद्यानासह रुग्णालयात अनेक सोयीसुविधांचा अभाव दिसून येत असल्याने असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना हल्ली बिकट समस्येचा सामना करावा लागतो. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत रुग्णांच्या सोयीसाठी दहा वर्षांपासून हे उद्यान उभारण्यात आले. परंतु, उद्यानात अनेक प्रकारचे गवत व झाडझुडपे वाढल्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. वास्तविक पाहता या जागी फुलांनी सजलेली रोपवाटिका व आरोग्यदायी झाडे असायला हवी होती, जेणेकरून रुग्णालय व आजूबाजूच्या परिसरातील जनतेला आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेता आला असता. परंतु, शासन व रुग्णालय प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. या गंभीर बाबींकडे जातीने लक्ष देऊन रुग्णालय परिसरातील उद्यान सुसज्ज करावे, अशी मागणी परिसरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून होत आहे.

  • प्रशासनाने हे करावे...
  • फुलांनी सजलेली रोपवाटिका व आरोग्यदायी झाडे हवीत.
  • रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी योग्य सोयीसुविधा द्याव्यात.
  • साफसफाईची व्यवस्था ठेवावी.
  • उद्यान सुसज्ज करावे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What kind of children's garden? This is "Pottshahi"