काय? मनपा कर्मचारी, शिक्षकांची दिवाळी अंधारात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर : सातव्या वेतन आयोगावरून कर्मचारी, शिक्षकांची थट्टा केल्यानंतर प्रशासन त्यांच्या दिवाळी उत्साहावरही विरजण टाकणार असल्याचे चित्र आहे. अद्याप ऑगस्टच्याच वेतनाची बिले मंजूर झाली नाही. त्यामुळे सप्टेंबरच्या वेतनाची बिलेही रखडणार असून, विभागप्रमुखांकडूनही दिरंगाई केली जात असल्याने कर्मचारी, शिक्षकांची दिवाळी अंधारात जाणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे. 

नागपूर : सातव्या वेतन आयोगावरून कर्मचारी, शिक्षकांची थट्टा केल्यानंतर प्रशासन त्यांच्या दिवाळी उत्साहावरही विरजण टाकणार असल्याचे चित्र आहे. अद्याप ऑगस्टच्याच वेतनाची बिले मंजूर झाली नाही. त्यामुळे सप्टेंबरच्या वेतनाची बिलेही रखडणार असून, विभागप्रमुखांकडूनही दिरंगाई केली जात असल्याने कर्मचारी, शिक्षकांची दिवाळी अंधारात जाणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे. 
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करीत दिलासा दिला. मात्र, महापालिकेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना दिवाळीतही वेतन मिळणार की नाही? या प्रश्‍नाने ग्रासले आहे. महापालिकेने शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ऑगस्ट महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगासह सप्टेंबर देण्यात येणार होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनाची शिट निरस्त करून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन शिट तयार केली. परंतु, राज्य सरकारने मंजुरीशिवाय सातवा वेतन आयोग लागू करता येणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तर नाहीच, पण सहाव्या वेतन आयोगाची वेतन शिट मोडीत काढल्याने वेतन कसे द्यायचे हा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ऑगस्टचे वेतन सप्टेंबरमध्ये ऍडव्हान्स म्हणून देण्यात आले. 
सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनाची शिट तसेच या वेतनाची बिले काढण्यासाठी विभागप्रमुखांची चांगलीच कसरत झाली. अद्यापही ऑगस्ट महिन्यातील वेतनाची बिले तयार झाली नसल्याचे सूत्राने नमूद केले. जोपर्यंत ही बिले तयार होणार नाही, तोपर्यंत सप्टेंबरचे वेतन तयार करणे शक्‍य होणार नसल्याची तांत्रिक बाबही पुढे आली. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असून, अनेक अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण आदी कामात गुंतले आहे. त्यामुळे सप्टेंबरचे वेतन बिले तयार करणे आदी प्रक्रिया संथ झाली. परिणामी दिवाळीपूर्वी सप्टेंबरचे वेतन मिळेल की नाही? याबाबत शिक्षक, कर्मचारी साशंक असून, त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. ज्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याचे वेतन ऍडव्हान्स म्हणून दिले, त्याचप्रमाणे सप्टेंबरचे वेतन द्यावे, अशी मागणी कर्मचारी व शिक्षक करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What? Municipal staff, teachers' Diwali in the dark