कोणी सांगता का; पक्ष्यांसाठी आवाजाची मर्यादा किती? 

केतन पळसकर 
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

- भारतामध्ये अद्याप संशोधन नाही 
- केवळ मानवाच्या दृष्टीने नियम 
- पक्ष्यांची स्थिती मानवापेक्षा असते अतीनाजूक 
- लहान आकारातील पक्ष्यांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यूदेखील होऊ शकतो 

नागपूर : कर्कश्‍य हॉर्न, हृदयाचे ठोके चुकविणारा डी.जे. व फटाक्‍यांच्या आवाजातून निर्माण होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्याला नेहमीच फटका बसतो. यावर डेसीमलचा आधार घेत मर्यादा आखल्याचे देखील आपण ऐकतो व वाचतो. मात्र, पशू-पक्ष्यांच्या जीवनमानाच्या दृष्टीने ध्वनी आणि वायू प्रदूषणाची मर्यादा कुठल्या संस्थेने वा प्रशासनाने आखल्याचे आपण कधी ऐकले आहे का? त्याचे उत्तर "नाही' असेच मिळेल. कारण, भारतातील कुठल्याही संस्थेने किंवा व्यक्तीने त्याचे प्रमाण अद्याप निश्‍चित केले नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. 
भारतीय व्यवस्थेमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विशेष कायदे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये हवा, जल, ध्वनी या विभागानुसार नियम तयार केले आहेत. त्यानुसार हवेची, पाण्याची गुणवत्ता आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. ठराविक वेळा, ग्रामीण व शहरी भागानुसार आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण होते काय? यावर विशिष्ठ विभागाद्वारे देखरेख ठेवण्यात येते. शिवाय गणेशोत्सव, दिवाळी अशा उत्सवासह उद्योगधंद्यासारख्या बाबींचासुद्धा त्यामध्ये विचार केला जातो. मात्र, यंत्रणेनी हे सर्व नियम फक्त मानवी जिवनाला डोळ्यासमोर ठेऊन आखले आहेत. 
दुर्देवाने यामध्ये पक्ष्यांचा विचार अद्याप करण्यात आला नाही. पक्ष्यांची स्थिती मानवापेक्षा अतीनाजूक असते. कारण, त्यांची श्रवण क्षमता आणि गंध घेण्याची तीव्रता मानवापेक्षा कित्तेक पटींने जास्त असते. फटाक्‍यांच्या आवाजाने मानवाला धडकी भरते. मात्र, पक्ष्यांना त्याची मोठी हानी सहन करावी लागते. लहान आकारातील पक्ष्यांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यूदेखील होऊ शकतो. व्यवस्थेने आखलेल्या नियमांमध्ये मानवाचा जरी विचार करण्यात आला असला; तरी यामध्ये पक्ष्यांच्या जीवनमानाचा विचार केलेला नाही. त्यादृष्टीने संशोधन देखील झाले नसल्याची माहिती संशोधक आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांनी दिली.
दिनचर्येवर परिणाम 
माणसाने योग्य पद्धतीने एखाद्या पक्ष्याला न हाताळल्यास पक्षी घाबरतो. यामुळे हृदयविकाराच्या झटक्‍याने त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. अशातच फटाक्‍यांसह अन्य आवाजांचा परिणाम पक्ष्यांवर किती आणि कसा होतो, याची कल्पना भयावह आहे. विविध ठराविक, लहान-मोठ्या आवाजांद्वारे पक्षी आपापसात संवाद साधतात, आपल्या जोडीदाराला आकर्षित करतात. प्रदूषणामुळे त्यांच्या या दिनचर्येवरसुद्धा परिणाम होतो. 

पक्षांना विविध वायूमुळे आणि ध्वनींमुळे अनेक आजार होतात. शिवाय त्यांच्या प्रजननावर देखील परिणाम होतो. याबाबत अनेक संशोधन झाले आहेत. मात्र, दुर्देवाने पंक्षाच्या जीवनमानाच्या दृष्टीने आवाजाची मर्यादा किती असावी याबाबत अद्याप देखील देशामध्ये संशोधन झाले नाही. 
- शिरीष मंची, प्रमुख वैज्ञानिक, 
सलीम अली पक्षीविज्ञान आणि प्रकृती विज्ञान केंद्र (भारत सरकार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the sound limit for birds?