माजी ऊर्जामंत्र्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांबद्दल सरकारला केली विनंती! म्हणाले

अतुल मेहेरे
Wednesday, 23 September 2020

ग्रामपंचायतची निवडणूक त्यांनी या काळात घेतली तरी त्यांना यश मिळणार नाही. आम्ही कोणत्याही निवडणुकीची तयारी करीत नाही, तर सदैव तयारच असतो.

नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. काही राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाल्याचीही माहिती आहे. पण कोरोनाचा उद्रेक ग्रामीण भागातही प्रचंड आहे. त्यामुळे अजून सहा महिने तरी ग्रामपंचायत निवडणूक घेऊ नये, अशी मागणी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे.

बावनकुळे म्हणाले, कोणत्याही निवडणुकीसाठी आम्ही २४ तास आणि ३६५ दिवस तयार आहोत. पण ग्रामीण भागांत कोरोनाची स्थिती गंभीर आहे आणि या परिस्थितीत निवडणुका घेतल्यास संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक टाळलेलीच बरी. निवडणूक आयोगाने सध्या तरी निवडणुका घेण्याचा विचार लांबवावा आणि कोरोनाच्या संक्रमणाचा धोका पत्करू नये. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. प्रत्येक गावात आणि प्रत्येक मतदान केंद्रावर आमचे कार्यकर्ते तयार आहेत. पण कोरोनाचा प्रकोप अधिक वाढू नये, म्हणून निवडणुका सहा महिने टाळाव्या.

गेल्या निवडणुकीत भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळविले होते. यावेळी जरी राज्यात आमचे सरकार नाही, तरीही आम्ही अधिकाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवू. कारण राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज आहेत. सोयाबीन, कापूस, धान सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. शेतकरी उद्ध्वस्त झाला. पण सरकारने काडीचीही मदत केली नाही. राज्यभर कोरोनाचा उद्रेक झाला आहे आणि मुख्यमंत्री घरात बसले आहेत. रुग्णांना उपचार मिळत नाहीत, रुग्णालयांत बेड्स नाहीत, ऑक्सिजनअभावी रुग्ण मरत आहेत. त्यामुळे या सरकारवरून लोकांचा विश्‍वास उडाला असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

जनतेने गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारचे काम पाहिले आहे. तसेही महाविकास आघाडी सरकार हे लोकांच्या मनातील सरकार नाही. राजकीय स्वार्थापोटी धरून बांधून तयार झालेले हे सरकार आहे. म्हणूनच कोरोनाच्या भयावह स्थितीत सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. प्रत्येक आघाडीवर महाविकास आघाडी अपयशी झाली आहे. त्यांना आता लोक उभेही करणार नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतची निवडणूक त्यांनी या काळात घेतली तरी त्यांना यश मिळणार नाही. आम्ही कोणत्याही निवडणुकीची तयारी करीत नाही, तर सदैव तयारच असतो. पण कोरोनाच्या स्थितीमुळे या निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकाव्या, अशी सरकारला आणि निवडणूक आयोगाला विनंती असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is a statement of Bavankule about elections of Grampanchayat