काय वेळ आली बळीराजावर... वाचा

अतुल दंढारे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

नुकसानभरपाई देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतरही कोणाताही अधिकारी पाहणीसाठी बांधावर आला नाही. पीक हातात येणार नसल्याचे पाहून मेंढला येथील शेतकरी वसंता वाडबुदे यांनी दोन एकर कपाशीवर रोटावेटर फिरविला.

मेंढला (जि. नागपूर) : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. यामुळे शेतकरी पुरता निराश झाला आहे. नुकसानभरपाई देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतही कोणाताही अधिकारी पाहणीसाठी बांधावर आला नाही. पीक हातात येणार नसल्याचे पाहून मेंढला येथील शेतकरी वसंता वाडबुदे यांनी दोन एकर कपाशीवर रोटावेटर फिरविला. खर्चाच्या तुलनेत कमी उत्पादन निघणार असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. 

Image may contain: sky, outdoor and nature
कपाशीवर रोटावेटर फिरविताना मजूर 

मेंढला परिसरात कपाशीचे उत्पादन सर्वांत जास्त घेतले जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. कपाशीचे यंदा चांगले उत्पादन होईल असे शेतकऱ्याला वाटत होते. परंतु, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली.

जेव्हा कपाशीला पात्या व फुले होते तेव्हा परतीचा जोरदार पाऊस झाला. यामुळे कपाशीच्या पूर्ण पात्या खाली आल्या. दुसऱ्या पात्यासाठी शेतकऱ्याने महागडी औषधाची फवारणी केली. परंतु, कपाशी जाग्यावर आली नाही. 

Image may contain: plant, grass, outdoor and nature
रोटावेटर फिरविण्याच्या पूर्वीचे शेत 

सतत वातावरणात होणारा बदल, कधी पाऊस जास्त तर दमट हवामानामुळे कपाशीचे चांगले उत्पादन होणार नाही असे शेतकऱ्याला वाटत होते. कपाशी पूर्णपणे पिवळी पडली होती. कपाशीला पाच ते दहा बोंड होते. उत्पादन खर्चही निघणे शक्‍य नव्हते. यावर्षी उत्पादन एकरी दोन क्‍विंटलच्या वर होणार नसल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने दोन एकर कपाशीवर रोटावेटर फिरविला. 

Image may contain: outdoor and nature
रोटावेटर फिरविल्या नंतरचे शेत 

राज्य सरकारने परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र, पाहणीसाठी कृषी विभाग शेतकऱ्याच्या बांधावर आला नाही. निव्वळ आश्‍वासन देण्याचे काम सरकार करीत आहे. कृषी विभाग कुंभकरणी झोपेत आहे, असा अरोप शेतकरी वसंता वाडबुदे यांनी केला आहे. 

सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ 
मागच्या वर्षी नरखेड तालुक्‍याला बोंडअळीच्या नुकसान भरपाईतून वगळल्यामुळे शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहिला होता. यंदा कपाशी पिकाने शेतकऱ्यांचे पूर्ण कंबरडे मोडले. सातबारावर कर्ज असल्याने बॅंक कर्ज देत नाही. अशावेळी शेतकरी सावकाराच्या दारात उभा राहण्याची वेळ आली आहे. तरी सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मेंढला, वाढोणा, रामठी, हिवरमठ, आरंभी, पिपळदरा, रामपुरी, बानोरचंद, दावसा, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा, तारा उतारा, खलानगोंदी, दातेवाडी, उमठा, वडविहरा, सिंजर, साखरखेडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. 

Image may contain: 1 person, standing, outdoor and nature
वसंता वाडबुदे

कोणताही अधिकारी आला नाही 
परतीच्या पावसाने पूर्ण कपाशी पिवळी पडली. पाच ते दहा बोंड कपाशीला होते. फवारणी केल्यावरही कपाशी जाग्यावर आली नाही. सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली; पण शेतात कोणताही अधिकारी आला नाही व पाहणी केली नाही. त्यामुळे मी कपाशीवर रोटावेटर फिरविला. 
- वसंता वाडबुदे, शेतकरी, मेंढला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What time was it on the farmer?