काय...? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे संकेतस्थळ "अपडेट' नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

नागपूर  : आयटी रिफॉर्म व डिजिटल विद्यापीठ असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे संकेतस्थळ "अपडेट' नसल्याची माहिती समोर आली आहे. या कारणाने विद्यार्थ्यांना फटका बसत असून, सिनेट सदस्यांनी संकेतस्थळाचे अपग्रेडेशन कधी होणार, असा प्रश्‍न शुक्रवारी (ता.1) झालेल्या बैठकीत उपस्थित करीत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. 

नागपूर  : आयटी रिफॉर्म व डिजिटल विद्यापीठ असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे संकेतस्थळ "अपडेट' नसल्याची माहिती समोर आली आहे. या कारणाने विद्यार्थ्यांना फटका बसत असून, सिनेट सदस्यांनी संकेतस्थळाचे अपग्रेडेशन कधी होणार, असा प्रश्‍न शुक्रवारी (ता.1) झालेल्या बैठकीत उपस्थित करीत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. 
विद्यापीठात डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि मानांकन परिषदेच्या (नॅक) मूल्यांकनाला सामोरे जायचे आहे. नव्या मूल्यांकन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांकडून "फिडबॅक' घेण्यात येणार आहे. यात विद्यापीठाकडून उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा आणि संकेतस्थळावरून मिळणारी माहिती पुरेशी आहे काय? यावरही गुणांकन होणार आहे. मात्र, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती मिळत नसल्याची बाब सिनेट सदस्य डॉ. धनश्री बोरीकर आणि ऍड. मनमोहन वाजपेयी यांनी प्रश्‍न आणि प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केली. डॉ. बोरीकर यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती, प्रश्‍नसंच व आदर्श उत्तर नसणे, माजी विद्यार्थ्यांसंबधी माहितीचा अभाव, दिलेल्या "लिंक'मधून माहितीच मिळत नसल्याचीही माहिती दिली. सहा महिन्यांपूर्वीच्या बैठकीत याबद्दल प्रस्ताव मान्य केल्यावरही प्रशासनाने संकेतस्थळाचे अपग्रेडेशन केले नसल्याची खंतही व्यक्त करीत, नॅक मूल्यांकनावर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. 
ऍड. वाजपेयी यांनी विद्यापीठाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. तसेच ऍन्युअल क्वालिटी एश्‍शुरन्स रिपोर्ट, प्लेसमेंट, अभ्यासक्रमांची माहिती, अधिकाऱ्यांचे प्रोफाईल अपडेट नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पेमेंट आणि इतर ऑनलाइन सुविधा देण्याची मागणी केली. त्यावर प्रशासनाकडून कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी येत्या काही दिवसात "डिजिटलाझेशन'साठी निविदा मागवून घेत, काम सुरू करण्यात येणार असल्याचे उत्तर दिले. तसेच 2015 पासूनच्या पदवी ऑनलाइन देण्यास सुरुवात झाल्याची माहितीही त्यांनी दिली. 
माहिती केंद्र बंद 
विद्यापीठात आलेल्या विद्यार्थ्याला कुठली माहिती कुठे मिळेल, यासाठी माहिती केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दीड वर्षापूर्वी ऍड. मनमोहन वाजपेयी यांनी सिनेटमध्ये मांडला होता. या प्रस्तावाला मान्यता देत, तत्काळ दुसऱ्या दिवशीपासून विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत माहिती केंद्र सुरू करण्यात आले. पंधरा दिवसातच हे माहिती केंद्र बंद करण्यात आले. विद्यापीठात आलेल्या विद्यार्थ्याला कुठला विभाग नेमका कुठे आहे, याची माहिती देणारा साधा फलक परिसरात नाही. त्यामुळे हे केंद्र सुरू करण्यात आले होते. ते बंद झाल्याने विद्यार्थी सैरभैर परिसरात फिरत असल्याचे चित्र दिसून येत असल्याचे ऍड. वाजपेयी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर संपूर्ण माहिती देणारे स्क्रीन परिसरात लावण्याचे आश्‍वासन कुलगुरूंकडून देण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What ...? Website of Rashtrasant Tukadji Maharaj Nagpur University is not "updated"