हे चाललंय काय? यवतमाळ : अल्पवयीन मुले वळताहेत गुन्हेगारीकडे?

सूरज पाटील
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

- मुलांना भाईगिरीचे आकर्षण
- दुचाकींसह मोबाइलच्या चोऱ्यांमध्ये अडकले
- मौजमजेसाठी उचलले पाऊल
- पोलिसांनी घेतले ताब्यात
- पालकांनी दखल घ्यावी

यवतमाळ : गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या वाढत्या घटनांनी पोलिसांच्या तोंडाला अक्षरशः फेस आणला आहे. नागरिकांनी थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवल्याने चोरट्यांच्या मुसक्‍या आवळायला सुरुवात करण्यात आली आहे. दुचाकींसह मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा आढळेला सहभाग चिंताजनक मानला जात आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे आकर्षण वाढत आहे. मित्रांसोबत राहून व्यसन करतात आणि त्याची सवय अधिकच जडल्याने खर्च भागविणे कठीण होऊन जाते. मग तरुणांच्या सहकार्याने चोरीकडे अल्पवयीन मुलांचे पाय आपोआप वळत आहेत. बुधवारी (ता. 13) यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त केल्या.

अल्पवयीन मुलगा जाळ्यात
शनिवारी (ता. 16) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल व दुचाकी चोरट्यांची टोळीच जेरबंद केली. त्यातही एक अल्पवयीन मुलगा जाळ्यात अडकला. चोरट्यांकडून पोलिसांनी सहा विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि 14 महागडे मोबाईल जप्त केलेत. गेल्या काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरणाऱ्या बालकांना पोलिसांनी आर्णीतून ताब्यात घेतले होते.

खून, हाणामारी, अत्याचारात बालकांचा सहभाग
यापूर्वी अल्पवयीन अर्थात विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग खून, हाणामारी, चिडीमारी, अत्याचार आदी विविध घटनांत आढळून आला आहे. ही मुले चोरीकडे वळल्याने पालकांममधूनही चिंता व्यक्त होऊ लागली आहे. चोरीचे साहित्य खरेदी करणारे पोलिसांच्या रडारवर अपवादात्मक स्थितीत येत होते. मात्र, पोलिसांनी दुचाकी व मोबाईल खरेदी करणाऱ्यांनाही ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यातही 18 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांचा सहभाग आहे.

खात्रीनंतरच खरेदी करण्याचे आवाहन
जुनी दुचाकी किंवा मोबाईल खरेदी करताना कागदपत्रांची ओळख पटवून घेणे आवश्‍यक आहे. चोरीचा माल स्वीकारणे दखलपात्र व बिनाजमानतीचा गुन्हा आहे. दुचाकी चोरी केल्यानंतर त्याचे सुटे भाग भंगार दुकानात विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे खात्री करूनच खरेदी व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what is this? Yavatmal: Minors boys turning to crime?