वारी चुकली म्हणून काय?  विठ्ठल येई भक्तादारी! वाचा, नरहरी महाराज यांनी व्यक्त केल्या वारकऱ्यांच्या भावना 

दिनकर गुल्हाने 
Tuesday, 30 June 2020

विठुराया संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. वारकऱ्यांचा तो श्वास आहे. आषाढीवारीला विठुराया भक्तांच्या दर्शनाला आसुसलेला असतो आणि वारकरी दिंडीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीला आवडीने जातात.

पुसद (जि. यवतमाळ) :  विठुराया संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. वारकऱ्यांचा तो श्वास आहे. आषाढीवारीला विठुराया भक्तांच्या दर्शनाला आसुसलेला असतो आणि वारकरी दिंडीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीला आवडीने जातात. शेकडो वर्षांची दिंडीची ही परंपरा यंदा कोरोना विषाणूने ग्रासली आहे. वारकऱ्यांच्या दिंडीत प्रथमच खंड पडला आहे. असे असले तरी विठुराया व भक्तांच्या मनात कुठलेही अंतर नाही. वारी चुकली म्हणून काय झाले? विठ्ठलभक्ताच्या दारी दर्शन देईल, अशा भक्तीने ओतप्रोत भावना हरिभक्त परायण नरहरी महाराज वेणीकर यांनी व्यक्त केल्या. 

पूस नदीतीरावरील भावार्थदीपिका सदनात ज्ञानेश्वरीचे ज्येष्ठ अभ्यासक, प्रवचनकार नरहरी महाराज यांच्याशी संवाद साधला असता, ते 'सकाळ'शी तन्मयतेने बोलत होते. 72वर्षीय नरहरी महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सोप्या शब्दांत आपल्या सुश्राव्य व निरंतर प्रवचनातून सुमारे 40 वर्षे सेवा दिली आहे. संतांच्या अभंगरूपातील समाजप्रबोधनाचा सुगंध त्यांच्या कार्यातून पुसद परिसरात दरवळला. मधुमेहाने ग्रासले असतानाही पंढरीच्या वारीबद्दल बोलताना ते भारावले. 
ते म्हणाले- 
"भेटी लागी जिवा लागलीसे आस 
पाहे रात्रंदिवस वाट तुझी" 

या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून वारकऱ्यांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. लग्न झालेल्या मुलीला जशी माहेरची आस असते, तीच विठुरायाच्या चरणी डोके ठेवाण्याची घाई भक्तांना झालेली असते. म्हणूनच वारकरी म्हणतात- 
"माझे माहेर पंढरी 
आहे भिवरेच्या तीरी" 

हा वारीचा सोहळा भोळाभाबडा असतो. पायीवारीत चालण्याचा आनंद स्वर्गालाही लाजवतो. अनेक रंगांचे लोक यात एकत्र येतात आणि बनतो तो केवळ एकच भक्तिरंग. जाती-धर्म-पंथ, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, अक्षर-निरक्षर असा कुठलाही भेदाभेद वारीत नसतोच कुठे. म्हणूनच हा वारीचा प्रवाह सालागणिक वाढत जातो.

अवश्य वाचा- पतीला सोडून प्रियकराच्या प्रेमात आकंठ बुडाली आणि उघडकीस आली ही घटना....

कीर्तन-प्रवचन, टाळकरी-वारकरी, नामाचा गजर, टाळ-मृदंगाच्या सुरात नाचणारी पावले, डोक्‍यावर तुळशी वृंदावन, गळ्यात तुळशीमाळा असा हा सोहळा अद्‌भुतच म्हणावा लागेल. विठ्ठल प्रेम हे सोहळ्याचे सूत्र आहे आणि ते जपताना वारकरी विठुरायाच्या भक्तीत आकंठ बुडून जातात, हीच खरी ईश्वरभक्ती होय, असे नरहरी महाराज म्हणाले. 

"यंदाची वारी थांबली. याची सल मनात आहे. परंतु, विठ्ठलभक्त समजूतदार आहेत. पांडुरंगाचे दर्शन यंदा आषाढी एकादशीला घरातूनच घेण्याचा त्याचा निग्रह आहे. विठुराया दर्शनाला घरी येईलच, हा प्रत्येक वारकऱ्याचा विश्वास आहे. विठ्ठल म्हणजे श्वास आणि वारी म्हणजे विश्वास या भावनांमध्ये वारकऱ्यांच्या मनात कुठलाही कल्लोळ नाही. लहानपणापासूनच वारीत गेलो, संसारात मीरा सोबत पायी चाललो. विठ्ठलभक्तीत डुंबलो. या वारीतून मनाला समाधान लागते. सकारात्मक ऊर्जा मिळते. वर्षभर चैतन्याची पखरण होते. या वारीतून विठ्ठलाची गळाभेट होते.

यासारखा आनंद वारकऱ्यांच्या जीवनात नसतोच कुठे? हे सांगताना नरहरी महाराज म्हणाले की, "कोरोनातील खंडित झालेल्या या वारकरी दिंडीची अस्वस्थता मनात कायम राहील. तथापि, विठ्ठलभक्तांनी आसुसलेल्या नजरेने घरी बसूनच विठूमाउलीचे सुंदर ते ध्यान मनातच स्मरावे. जय हरी विठ्ठल!"  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What's wrong with Wari? Vitthal yei bhaktadari!