गहू उत्पादकांना कोरोना एवढीच पावसाची भीती; पुन्हा वादळी पावसाचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

यावर्षी जिल्ह्यात गव्हाचा पेरा सुद्धा वाढला. पेरणीनंतर सुद्धा प्रत्येक महिन्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गव्हाला मुबलक पाणी मिळून सर्वत्र गव्हाचे पीक डौलदार झाले.

अकोला : जिल्ह्यात बहुतांश भागात अजूनपर्यंत गव्हाचे पीक शेतात उभे असून, ते काढण्यासाठी काही दिवसांचा अवधी बाकी आहे तर, काही ठिकाणी मजूर, मशीन मिळत नसल्याने काढणी बाकी आहे. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागानेही पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून, त्यामुळे जिल्ह्यातील गहू उत्पादकांना, कोरोना एवढीच पावसाची धास्ती लागली आहे.

यावर्षी जिल्ह्यात मॉन्सून लांबल्याने व अतिवृष्टी झाल्याने जमिनीला चांगली ओल मिळाली व रब्बी पिकांसाठी काही प्रमाणात पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात गव्हाचा पेरा सुद्धा वाढला. पेरणीनंतर सुद्धा प्रत्येक महिन्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गव्हाला मुबलक पाणी मिळून सर्वत्र गव्हाचे पीक डौलदार झाले. जिल्ह्यात काही भागात लवकर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी गहू काढला असून, त्यांंना एकरी 10 ते 20 क्विंटल सरासरी उत्पादन मिळाले आहे. परंतु, बहुतांश भागात उशिरा पेरणी झालेले पीक अजूनही शेतातच उभे आहे.

हेही वाचा - मी दिसताच मुलगी रडते, पण तरीही तिला जवळ घेता येत नाही

काही ठिकाणी पीक काढण्यासाठी तयार आहे. परंतु, कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने, पीक काढणी मशीन मिळायला अडचण येत आहे तसेच मजूर सुद्धा मिळत नाही आहे. याचवेळी पावसाने पुन्हा डोके वर काढले असून, शनिवारी काही भागात सरी सुद्धा कोसळल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे पुढेही काही दिवस जिल्ह्यासह विदर्भात जोरदार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले असून, त्यामुळे जिल्ह्यातील गहू उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wheat growers fear the of rain