मायलेकीच्या तांडवाने एसटीचा "चक्का जाम'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

चंद्रपूर : एसटीला स्वत:च मागून युवतीने दुचाकीने धडक दिली. त्यानंतर आईसह आगारात जाऊन धुडगूस घातला. या मायलेकीच्या तांडवामुळे कर्मचारी वैतागून गेले आणि शेवटी त्यांनी कामबंद केले. त्यामुळे बससेवा ठप्प झाली. चंद्रपूर-नागपूर मार्गावर आणि आगारात बसच्या रांगाच-रांगा लागल्या होत्या. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली. वाद मिटला आणि तब्बल चार तासांनंतर बससेवा पूर्ववत सुरू झाली. यामुळे मात्र प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

भद्रावती- चंद्रपूर एसटी भद्रावतीहून चंद्रपूरकडे येत असताना स्थानिक प्रियदर्शिनी चौकात दुचाकीवरील युवतीने बसला मागेहून धडक दिली. चुकी तिची असतानाही तिने बसचालक संजय कन्नाके यांना शिवीगाळ सुरू केली. आई-वडिलाला घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनीही बसचालक कन्नाके यांना धक्काबुक्की केल्याचे आणि दहा हजार रुपये नुकसानभरपाईची मागणी केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यानंतर कन्नाके बस घेऊन चंद्रपूर बसस्थानकावर आले. तिथेही या दोघेही मायलेकी त्यांचा पाठलाग करीत आले. त्यांनीही येथेही चांगलाच धुडगूस घातला. पोलिस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या नावाने अश्‍लील शिवीगाळ सुरू केली. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.उलट त्यांची मुजोरी वाढतच गेली. शेवटी एसटी कर्मचाऱ्यांचाही संयम सुटला. त्यांनी आगारप्रमुखाला घटनेची माहिती झाली. आगारप्रमुखला घेऊन बसचालकांनी रामनगर पोलिस ठाणे गाठले. कर्मचाऱ्याला मारहाणीची तक्रार त्यांनी दिली. परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे आधीच संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा संयम सुटला. सर्वच बस चालकांनी अघोषित चक्का जाम केला. आगारातून कोणतीही बस स्थानकाबाहेर काढायची नाही आणि आत येऊ द्यायची नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे तब्बल चार वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर आणि बसमध्येच अडकून राहावे लागले. याचा प्रचंड त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.
नागपूर-चंद्रपूर, चंद्रपूर -मूल मार्गावर एसटीच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. दुसरीकडे त्या मायलेकींनीही रामनगर पोलिस ठाणे गाठले. त्यांचीही तक्रार नोंदवून घेतली. वृत्तलिहीपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिसांनी बसस्थानकात कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची समजूत काढली आणि चार तासानंतर बससेवा पूर्ववत सुरू झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Wheel Jam" in ST BUS