बोळदे गावात अस्वल शिरते तेव्हा...! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

गुरुवारी सायंकाळचे सहा वाजले होते. गावातील गुरे-ढोरे जंगलातून चरून नुकतीच परतली होती. दिवाबत्तीची वेळ असल्याने बायाबापड्या आपआपल्या घरकामात व्यस्त होत्या. लहान मुले रस्त्यावर खेळत होती तर काही माणसं पारावर गप्पागोष्टीत रंगली होती. त्याच सुमारास गावात एक भले मोठे अस्वल शिरले. अस्वलाला पाहून जो-तो सैरावैरा पळत सुटला.

नवेगावबांध (जि. गोंदिया)  : येथून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात सायंकाळच्या सुमारासअस्वल शिरते. गावकऱ्यांच्या आरडाओरडीमुळे नंतर ते गावालाच लागून असलेल्या शेतातील झाडावर चढते. त्यानंतर गावकरी, वनविभाग आणि नवेगावबांधचे रेस्क्‍यू पथक त्याला पळवून लावण्यासाठी जीवाची बाजी लावतात. अखेर तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्या अस्वलाला जंगलात पळून जाणे भाग पडते. हा थरार गुरुवारी (ता. 7) बोळदे कवठा येथील गावकऱ्यांनी अनुभवला. 

जो-तो सैरावैरा पळत सुटला
बोळदे कवठा हे गाव जंगल परिसरात वसलेले आहे. गुरुवारी सायंकाळचे सहा वाजले होते. गावातील गुरे-ढोरे जंगलातून चरून नुकतीच परतली होती. दिवाबत्तीची वेळ असल्याने बायाबापड्या आपआपल्या घरकामात व्यस्त होत्या. लहान मुले रस्त्यावर खेळत होती तर काही माणसं पारावर गप्पागोष्टीत रंगली होती. त्याच सुमारास गावात एक भले मोठे अस्वल शिरले. अस्वलाला पाहून जो-तो सैरावैरा पळत सुटला.

अस्वल चढले झाडावर 
गावात अस्वल शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. अस्वलाला पाहण्यासाठी हातचे काम सोडून बाया, लहान मुले आणि माणसांनी एकच गर्दी केली. गावकऱ्यांच्या आरडाओरडीमुळे अस्वल घाबरले. ते गावाबाहेर पळायला लागले. गावाच्या टोकावर प्रकाश साऊस्कर यांचे घर आहे. घराच्या मागील बाजूलाच शेती आहे. या शेतात असलेल्या झाडावर चढून अस्वलाने आश्रय घेतला. अस्वलाला बघण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली.

फटाके फोडून लावले पिटाळून 
गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे क्षेत्रसहायक आर. एम. बहुरे, एम. टी. चव्हाण, आर. पी. परसगाये, धार्मिक यांचे पथक बोळदे येथे दाखल झाले. तोपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. त्यांनी बॅटरीच्या प्रकाश झोतात झाडावरील अस्वलाला शोधून त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काही जागचे हलेना. त्यानंतर त्यांनी झाडाखाली फटाके फोडले. त्यांची ही शक्कल कामी आली. फटाक्‍यांच्या आवाजाला घाबरून अखेर ते अस्वल जंगलाच्या दिशेने पळवून गेले. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. तब्बल तीन तास घडलेला हा थरार अनुभवून गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When a bear enters the village Bolde...