जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस विचारतात प्रश्न...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

'मी महाराष्ट्राच्या विकासाची कामे हाती घेतोय. तुम्ही बरोबर राहा. आम्हाला निवडून द्या. आपण विकास करू,' असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर : नागपुरात जागोजागी जनता थांबली आहे. पावसाळी वातावरण तरी चौकाचौकात गर्दी. मुख्यमंत्री विचारतात, भाजपला जनादेश देणार काय? जनता म्हणते, होय. मोदींना जनादेश देणार काय? जनता आणखी जोरात उत्तरते, होय. मग पुढचा प्रश्न येतो, नितीनजींना जनादेश देणार ना? होय उत्तर आल्यावर लगोलग प्रश्न येतो, 'मला जनादेश देणार?' होय, म्हणत 'भारतमाता की जय'चा घोष निनादतो... असे वातावरण सध्या नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देताना ते जनतेला संबोधित करत आहेत.

'मी महाराष्ट्राच्या विकासाची कामे हाती घेतोय. तुम्ही बरोबर राहा. आम्हाला निवडून द्या. आपण विकास करू,' असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

ते पुढे म्हणाले, 'त्यानंतर निवडणूक जिंकल्यावर मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईन, त्यावेळी आशीर्वाद द्या आणि आदेशही द्या.' या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा जयजयकार झाला. अन जनादेश यात्रा पुढे निघाली. आज नागपुरात ठिकठिकाणी हेच चित्र पाहायला मिळत होते. नागपूर दौरा आटोपून मुख्यमंत्री फडणवीस भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When the CM Fadnavis asks questions