कधी दूर होणार शाळांमधील अंधार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नागपूर - शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळविणाऱ्या शाळाच अंधारात असल्याचे दुर्दैवी चित्र पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांची वीजदेयके थकीत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई मंडळाकडून होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

थकीत देयकांबाबत शेकडो शाळांनी जिल्हा परिषदेकडे माहिती सादर केली. मात्र, प्रशासनाकडून देयके मंजूर करण्यात येत नसल्यामुळे शाळेतील शिक्षकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. वीजदेयकांबाबत विविध शिक्षक संघटनांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. यावर ऊर्जामंत्र्यांनी जिल्हा परिषदेला थकीत देयके मंजूर करण्याबाबत तसेच मंडळाने वीजपुरवठा खंडित करू नये, असे निर्देश दिले होते. परंतु, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार दोन्ही विभागांकडून होत आहे. यामुळे शाळांमधील वीजजोडणी त्या-त्या क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या नावे करून, संबंधित देयके ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या अनुदानातून किंवा उत्पन्नातून भरण्यात यावे, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

महाराष्ट्र शिक्षक सेना आक्रमक
जिल्हा परिषदेच्या शाळेतील वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, त्याचा फटका विद्यार्थी आणि शिक्षकांना बसू नये, यासाठी महाराष्ट्र शिक्षक सेना आक्रमक झाली आहे. शिक्षण विभाग आणि वीज मंडळ जाणीवपूर्वक ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र शिक्षक सेनेचे शरद भांडारकर यांनी केला आहे.

Web Title: when schools will be dark out?