कधी होणार काम सुरू ? : सुरजागड प्रकल्प अद्याप सुस्तावलेलाच

मिलिंद उमरे 
Sunday, 23 August 2020

बाकी सगळी मलई बाहेर गेली. हे उफराटे काम सुरू असतानाही कोणत्याच लोकप्रतिनिधीने आवाज उठवला नाही. सुरजागडवरून कंपनीच्या शेकडो ट्रकांनी मौल्यवान लोहखनिज जिल्ह्याबाहेर बिनदिक्‍कत पाठविण्यात आले.

गडचिरोली : वनसमृद्ध गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्‍यातील लोहखनिजयुक्त सुरजागड पहाडावर उत्खनन करून तेथील लोहखनिजावर भव्य प्रकल्प उभारून येथील नागरिकांचे दु:ख, दैन्य, दारिद्र्य दूर करू, अशा राणा भिमदेव थाटाच्या गर्जना अनेकांनी केल्या होत्या. पण, आता पावणे दोन वर्षांचा कालावधी लोटूनही या प्रकल्पाबाबत काहीच हालचाल दिसून येत नाही. हा प्रकल्प अद्याप सुस्तावलेलाच असून जिल्ह्याच्या उद्योगविहिनतेचा शाप दूर करू शकणाऱ्या या प्रकल्पाचे काम कधी सुरू होणार, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात जमिनीवर घनदाट वने, तर जमिन आणि डोंगरांच्या पोटात अनेक मौल्यवान खनिजे आहेत. यातीलच लोहखनिजांनी समृद्ध असा सुरजागड डोंगर एटापल्ली तालुक्‍यात आहे. या डोंगरातील कच्चे लोखंड काढून चामोर्शी तालुक्‍यातील कोनसरी येथे प्रकल्प उभारून तेथे या कच्च्या लोखंडाचे शुद्ध लोखंडात रूपांतर करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यासाठी लॉयड मेटल्स कंपनीने पुढाकार घेतला. या कंपनीने आधी उत्साहाने आणि अतिअधाशीपणाने सुरजगाड पहाड व परिसरातील हिरवाईची कत्तल केली. त्यासाठी तेथील लोकांचाच वापर करून त्यांना तात्पुरता रोजगार देण्यात आला. दरम्यान नक्षलवाद्यांची या प्रकल्पावर वक्रदृष्टी पडली आणि डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी येथे कामावर असलेली कंपनीची ८३ वाहने पेटवून दिली. खरेतर ही खासगी कंपनी असल्याने ही त्यांची समस्या होती. पण, सरकारने या कंपनीच्या मदतीला धावत त्यांना पोलिस संरक्षण बहाल केले.

कोरोनाचा कहर! नागपुरात रुग्णांचा आकडा २० हजार पार..जाणून घ्या आजची आकडेवारी 

मग, हजारो पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सुरजागड पहाडावरील लोहखनिजाचे उत्खनन सुरू झाले. खरेतर आधी कोनसरीचा प्रक्रिया प्रकल्प उभारून मग हे लोहखनिज काढायला हवे होते. पण, कंपनीने उफराटे धोरण अवलंबत आधी लोहखनिज उत्खननास प्रारंभ केला आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रकल्प नसल्याने तो चंद्रपूर जिल्ह्यात पाठविणे सुरू केले. म्हणजे येथील नागरिकांना आपल्याच पूर्वजांनी जपलेली हिरवाई नष्ट करण्यापुरता रोजगार मिळाला. बाकी सगळी मलई बाहेर गेली. हे उफराटे काम सुरू असतानाही कोणत्याच लोकप्रतिनिधीने आवाज उठवला नाही. सुरजागडवरून कंपनीच्या शेकडो ट्रकांनी मौल्यवान लोहखनिज जिल्ह्याबाहेर बिनदिक्‍कत पाठविण्यात आले. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथील प्रकल्पाचे थाटात भूमिपूजन करण्यात आले. भाजपच्या परंपरेप्रमाणे हा सोहळा फक्त "इव्हेंट' म्हणूनच साजरा झाला. त्यानंतर तिथे एक वीटसुद्धा रचण्यात आली नाही. पुढे १६ जानेवारी २०१९ ला लॉयड मेटल कंपनीचा लोहखनिज वाहून नेणारा ट्रक व राज्य परिवहन महामंडळाची बस यांच्यात जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात चारजण ठार झाले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कंपनीचे १६ ट्रक पेटवून दिले. त्यानंतर हे प्रकरण चिघळले आणि पुढे कंपनीचे कामच थांबले. या घटनेला आता एक वर्ष आठ महिन्यांचा कालावधी होत असतानाही हा प्रकल्प थंडबस्त्यातच आहे. 

मग, ओरबाडले कशाला ?
कोणताही उद्योग उभा करताना कच्च्या मालासोबत आधी तो साठवायची जागा व प्रक्रिया करण्याचा कारखाना याचा विचार केला जातो. किंबहुना कारखाना व साठवणुकीची व्यवस्था झाल्यावरच कच्चा माल आणणे सुरू होते. पण, या कंपनीने आधी उद्योगाचे स्वप्न दाखवत सुरजागड परिसरातील हजारो झाडांची कत्तल केली. येथील लोहखनिज काढून बाहेर पाठवले आणि आता सारेकाही थंडबस्त्यात टाकले. जर उद्योग उभारायचाच नव्हता, तर सुरजागड पहाडाची हिरवाई व लोहखनिज ओरबाडलेच कशाला, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

खरेतर आमचा व ग्रामसभांचा या प्रकल्पालाच विरोध आहे. रोजगार किंवा विकासाच्या नावावर कुठेही अशाप्रकारची नैसर्गिक संसाधनांची लूट होणे सर्वथैव चुकीचे आहे. सुरजागड प्रकल्पाबाबत ग्रामसभांना सोबत घेऊन आम्ही आमचा विरोध कायम ठेवणार आहोत.
- रामदास जराते, जिल्हा चिटणीस, शेतकरी कामगार पक्ष, गडचिरोली

-संपादन ः चंद्रशेखर महाजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the work start? : Surjagad project is still sluggish