एम्प्टात कोळसा होता, गेला कुठे?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

चंद्रपूर : भद्रावती तालुक्‍यातील कर्नाटक एम्प्टा कोळसा खाणीचा ताबा शासनाकडे हस्तांतरित करतेवेळी खाणीत कोळसा होता, याची कबुली आता जिल्हा प्रशासनानेच दिली आहे. मात्र, या खाणीतील कोळसा गेला कुठे, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. दरम्यान, बंद खाणीचे व्यवस्थापक ए. के. गौर यांनी 18 जून 2019 रोजी कोळसा चोरीची तक्रार भद्रावती पोलिसात केली आहे. मात्र, अद्याप याची चौकशी सुरू झालेली नाही.

भद्रावती तालुक्‍यातील बरांज, मोकासा, सोमनाळा, चिचोर्डी आणि बोथनाडा या गावांतील एकूण 1379.50 हेक्‍टर क्षेत्र कोळसा खाणीसाठी कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड, बंगलोर या कंपनीला मंजूर करण्यात आले. खाणपट्टा 12 सप्टेंबर 2005 पासून कर्नाटक एम्प्टा कोलमाईन्स लिमिटेड यांच्या नावे मंजूर होता. या खाणीतून 12 सप्टेंबर 2015 पर्यंत उत्खनन सुरू होते. त्यासाठी 187 कोटी स्वामित्वधनसुद्धा एम्प्टाने शासनाकडे जमा केले. मात्र, कोळसा घोटाळ्यात खाण अडकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 31 मार्च 2015 पासून एम्टाला दिलेला खाणपट्टा रद्द करण्यात आला. तेव्हापासून खाणीतील कोळशाचे उत्खनन बंद झाले. या कंपनीने खाणपट्टा शासनास हस्तांतरित करतेवेळी कोळसा शिल्लक असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्याठिकाणी चार लाख 51 हजार 284 मेट्रीक टन कोळसा शिल्लक होता. यातील अर्ध्याहून अधिक कोळसा चोरीला गेला. जवळपास शंभर कोटी रुपयांचा कोळसा माफियांनी बंद खाणीतून उडविला. यात पडोली परिसरातील युनूस नामक भंगार व्यावसायिक आणि त्याच परिसरातील एका प्रतिष्ठित ट्रान्स्पोर्ट कंपनीचा वापर केला गेला. त्यावेळी कोळसाचोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नाही. मात्र, चौकशी होईल, या भीतीने खाणीत थोडाफार शिल्लक कोळसा जाळून टाकण्यात आला. आता आयकर विभागाच्या कोळसा व्यापाऱ्यांवरील धाडीने एम्प्टाच्या कोळसा खाणही चर्चेत आली आहे. प्रशासनही या खाणीतील कोळसा चोरी झाली, हे मान्य करायला तयार नव्हते. परंतु आता या बंद खाणीच्या व्यवस्थापकानेच खाणीतील कोळसा चोरीची तक्रार केली आहे. प्रशासनानेही खाण बंद करतेवेळी कोळसा शिल्लक होता, याची कबुली दिली आहे. कोळसा होता तर तो गेला कुठे? हा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where is the coal in Empta?