बाप्पा, बाप्पा! एवढी मोठी दारू येते कुठून?

file photo
file photo


कुही/पचखेडी(जि.नागपूर) ः पोलिस म्हणतात, परिसरात अवैध दारू पकडून आम्ही परिसर "हंड्रेड परसेंट' दारूमुक्‍त केला. राजकीय नेते चमकोगिरी करीत मोठमोठे भाषणं ठोकून जातात. परंतु वेलतूर परिसरात दररोज अवैध दारूचा महापूर वाहताना उघड्या डोळ्यांनी पाहत असलेले ग्रामस्थ मात्र हे ऐकून चकीत होत एवढी दारू येते कुठून, असा प्रश्‍न खासगीत करताना दिसत आहेत.


वेलतूर पोलिस ठाण्यांतर्गत 94 गावे येतात. यापैकी वेलतूर येथे परवानाधारक देशी दारूची दोन दुकाने आहेत. मात्र 94 गावांपैकी जवळपास दहा गावांमध्ये राजरोसपणे अवैध दारूची विक्री होते. ही दारू येथे कुठून, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने करण्यात येत असला तरी पोलिस विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे गावकरी सांगतात. कायद्याच्या दृष्टिकोनातून परवानाधारक देशी दारूविक्रेत्यांना ज्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे, त्यालाच वैद्यकीय सल्ल्यानुसार निर्धारित केलेल्या प्रमाणात दारू विकायची आहे. शासनाने दिलेली परवानगी ही चिल्लर देशी दारूविक्रीची आहे. मग प्रश्न असा पडतो की वेलतूर वगळता इतर गावांमध्ये राजरोसपणे जी देशी दारूची अवैधपणे विक्री केली जाते, ती दारू कुठून कशी व कुणाच्या आशीर्वादाने आणली जाते, विकली जाते, याबद्दल तालुक्‍यातील ज्येष्ठ नागरिक संघटनेने आश्‍चर्य व नाराजी व्यक्त केली आहे. राजरोसपणे अवैध दारूची विक्री होत असताना अबकारी विभाग, पोलिस प्रशासन, गावातील तंटामुक्त समित्या, पोलिस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनाहे दिसत नाही का? की जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते, असा आरोप शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ महाराज यांनी केला.

वेलतूर पोलिस ठाण्यांतर्गत राजोला. वेलतूर शहर, माजरी, पचखेडी, डोंगरमौदा, गोठणगाव आदी गावांमध्ये अवैधरीत्या देशी दारू विकली जाते. गल्लोगल्ली दारू विकली जात असल्याने कित्येक लोकांचे कुटुंब उद्‌ध्वस्त झाले आहे, तर कित्येक शालेय विद्यार्थी व्यसनाधीन झाले आहेत. गल्लीबोळांतून जाताना महिला व मुलींना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गावागावांत होणारी अवैध दारूविक्री तत्काळ बंद करावी, अशी मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र गोंडाणे यांनी केली आहे.

प्रत्येकाने जवाबदारी पार पाडावी
आम्ही दारूबंदीसाठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करतो. आजपावतो दोनशेच्या वर लोकांना दारू पिण्यापासून परावृत्त केले. पण अवैध दारू विकणाऱ्यांवर, पिणाऱ्यांवर कायद्याचा धाक दिसत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली तर या अवैध दारूवर अंकूश बसू शकतो.
-काशीनाथ महाराज, व्यसनमुक्‍ती संघटना

शांतता व सुव्यवस्था निर्माण करा
माझ्या गावात दारूबंदी केल्यापासून शांतता व सुव्यवस्था नांदत आहे. आता सरपंच संघटनेचा अध्यक्ष या नात्याने तालुक्‍यातील अवैध दारूबंदीचा उपक्रम हाती घेऊन तालुक्‍यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करायची आहे.
-जितेंद्र गोंडाणे, अध्यक्ष, सरपंच संघटना

पोलिस विभाग अपयशी
कुही महिला संघटनेच्या वतीने आम्ही गेल्या चार वर्षांपासून तालुक्‍यात दारूबंदीची मागणी शासनस्तरावर करीत आहोत. नारे निदर्शने, मोर्चे काढले. तहसीलदार, पोलिस ठाणे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिलीत. मागच्या वर्षी जवळजवळ 1055 महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन देऊनही शासनस्तरावरून काहीही कार्यवाही झाली नाही. वेलतूर परिसरातील अवैध दारू महिलांच्या सहकार्याने पकडून दिल्यानंतरही अवैद्य धंदे बंद करण्यास पोलिस विभाग अपयशी ठरला आहे.
-समीक्षा गणवीर, संयोजक, कुही तालुका महिला संघटन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com