नक्षलवाद्यांना पावसाळ्यात कोण करतात मदत...वाचा 

मिलिंद उमरे  | Saturday, 27 June 2020

पावसाळ्याच्या दिवसांत अनेक नक्षलवादी वेश बदलून गावातही राहतात. गावात आपला गणवेश विशिष्ट ठिकाणी लपवून ग्रामीण वेश घालून कधी शेतात नांगर धरतात, कधी रोवणी करतात, कधी काड्या तोडायला जातात.

गडचिरोली : पावसाळा सुरू झाला की, अनेकांना प्रश्‍न पडतो, नक्षलवादी नक्‍की काय करत असतील, कसे जगत असतील. हा काळ नक्षल्यांसाठी कठीण असला, तरी पावसाळ्यातील अनेक समस्या हे नक्षलवादी विविध उपायांचा वापर करून सोडवतात. त्यासाठी प्लॅस्टिक, दोर व इतर अनेक साहित्याचा वापर होतो. तरीही पावसाळ्यातील हा काळ त्यांच्यासाठी अडचणीचा असल्याने या काळात नक्षल्यांच्या हिंसक कारवायांचे प्रमाण कमीच असते. 

हे वाचा—ऐन हंगामात खताचा तुटवडा? शेतकरी हवालदिल

नक्षलवाद्यांची चळवळ जशी नियोजनबद्ध आहे, तसेच त्यांची कामेही अतिशय नियोजनबद्ध असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच साधारणत: तेंदू हंगामात नक्षलवादी अतिदुर्गम गावांतून धान्य गोळा करणे सुरू करतात. यात गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, डाळ, दूध पावडर, साबण, औषधे अशा अनेक साहित्याचा समावेश असतो. हे साहित्य ट्रॅक्‍टरद्वारे जंगलातील थोड्या उंच जागेवर किंवा उतार असलेल्या जागेवर जिथे पावसाचे पाणी थांबणार नाही, अशा ठिकाणी खड्डे करून पुरण्यात येते. यालाच धान्य डम्प करणे म्हणतात. विशेष म्हणजे अनेकदा पैसे, बंदूक व इतर हत्यारेही अशी डम्प केली जातात. हे डम्पिंग स्पॉट्‌स कुठे आहेत, याची माहिती फक्त दलम कमांडरला असते. गरज पडेल त्यानुसार या गुप्त भूमिगत साठ्यातून साहित्य काढून वापरले जाते. कितीही पाऊस आला, तरी नक्षलवादी रेनकोट किंवा छत्री कधीच वापरत नाहीत. त्यामुळे जंगलात वेगवान हालचालींना अडथळा येतो. त्याऐवजी लांब प्लॅस्टिक डोक्‍यावरून पाठीकडे पांघरतात. बरेच शेतकरी प्लॅस्टिक किंवा सिमेंट पोते एका बाजूने कापून डोक्‍यावर घेतात तसाच हा प्रकार असतो. ग्रामीण भागात याला "मोरा' म्हणतात. नक्षलवाद्यांकडे या काळात पाच बाय पाच फुट आकाराचे प्लॅस्टिक असते. स्वयंपाक करायचा असल्यास याच प्लॅस्टिकचा उपयोग छतासारखा करून भरपावसात ते स्वयंपाक करतात. शिवाय रात्री झोपण्यासाठी प्लॅस्टिकचाच तंबू वापरतात. भरपूर पाऊस झाला आणि दुथडी भरून वाहणारी नदी पार करायची असली, तर फक्त पुरुष मंडळी अंगावरचे सगळे कपडे काढून तंबूच्या प्लॅस्टिकमध्ये भरून बांधून घेतात. त्यानंतर या गाठोड्यासोबत नदी पार करण्यात येते.

Advertising
Advertising

हे वाचा— पोलिसांनी केला त्याचा धूम स्टाईल पाठलाग! अखेर जेरबंद 

कधी मोठा दोर घेऊन एक पट्टीचा पोहणारा सदस्य नदी पार करून दुसऱ्या काठावर एखाद्या झाडाला हा दोर बांधतो व तो पकडून इतर सारे नदी पार करतात. कधी गावातील नावाड्यांना बोलावून नावेतून नदी पार करण्यात येते. प्रत्येक नक्षलवाद्याच्या पाठीवर पिट्टू (पिशवी) असतो. त्यात ग्लास, प्लेट, कपडे धुण्याचे, अंघोळीचे साबण, तांदूळ, डाळ, दूध पावडर, चहा पावडर, चमचे, सलाईन, इंजेक्‍शनच्या सिरींज, काही ऍलोपॅथीची औषधे असतात. शिवाय कमरेला चाकू व एक दोरी असते. हे चाकू व दोरी त्यांना अनेक कामात उपयोगी पडतात. दलमसोबत दोन गंज व इतर काही जुजबी भांडेसुद्धा असतात. तसेच टॉर्च असते. पण, रात्रीच्या अंधारातही ही टॉर्च लावण्याची परवानगी नसते. अंधारात चालताना अगदीच गरज पडली, तर टॉर्चचा वापर होतो. एका दलममध्ये तीन टॉर्च असतात. चालताना पुढची व्यक्ती (फ्रंट पायलट), मधे असलेला दलम कमांडर व शेवटची व्यक्ती (बॅक पायलट) यांच्याकडेच या टॉर्च असतात. 

वेश बदलून गावात 
पावसाळ्याच्या दिवसांत अनेक नक्षलवादी वेश बदलून गावातही राहतात. गावात आपला गणवेश विशिष्ट ठिकाणी लपवून ग्रामीण वेश घालून कधी शेतात नांगर धरतात, कधी रोवणी करतात, कधी काड्या तोडायला जातात. गावात पोलिस आले किंवा काही कुणकूण लागली, तर हातात लोटा घेऊन शौचाला जायच्या बहाण्याने किंवा कधी सरपण आणायला जातो सांगत, काही ना काही बहाणे करून पसार होतात. पण, आता पूर्वीपेक्षा पोलिसांची संख्या आणि गस्त वाढली आहे. तसेच पोलिसांनाही नक्षलवाद्यांच्या या युक्‍त्यांची कल्पना आली आहे. त्यामुळे पोलिस त्यांचे कट उधळून लावतात.