इथे अहोरात्र का झटत आहे प्रशासन, आरोग्य विभाग ..वाचा

file photo
file photo

यवतमाळ : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या व येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती झालेल्या रुग्णाने सुरुवातीला प्रशासनाविरुद्ध ताशेरे ओढले. मात्र, नंतर त्याला त्याची चूक कळली. डॉक्‍टरांच्या अहोरात्र मेहनतीमुळेच आपण पूर्णपणे बरे होऊन घरी जात असल्याचे समजल्यावर त्याने वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्‍टर्स व कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले. एवढेच नाही, तर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग नागरिकांसाठी अहोरात्र झटत असल्याचेही त्याने सांगितले. 

पुसद येथील देशमुखनगरातील रहिवासी अमोल व्हडगिरेला खोकला व श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे 23 जुलै 2020ला तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला. त्यावेळेस त्याची प्रकृती खालावली होती. त्याच्यावर उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टर्स, नर्स व संपूर्ण कर्मचारी वर्ग सुरुवातीपासूनच परिश्रम घेत होते. गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण आरोग्ययंत्रणा नागरिकांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणारा प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाला पाहिजे, असा ध्यास संपूर्ण यंत्रणेने घेतला आहे. मात्र, व्यवस्थेमध्ये किंवा सुविधा पुरविण्यात कधीकधी कमतरता राहू शकते. हे सर्वांनी समजून घ्यायला हवे. आहे त्या संसाधनांचा व उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून सर्व रुग्णांना योग्य उपचारासोबतच मानसिक समाधान देणे, यालाच प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. असे असतानाही अमोल व्हडगिरे याने जिल्हा प्रशासनासह वैद्यकीय महाविद्यालयाची संपूर्ण व्यवस्थाच आपल्या जिवावर उठली आहे, असा समज करून घेतला व या गैरसमजूतीतून सोशल मीडियावर व्यवस्थेविषयी रोष व्यक्त केला. याची दखल पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली. याप्रकरणी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्यासाठी व रुग्णाने केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठण केले. एकीकडे या सर्व बाबी होत असतानाच अमोलवर योग्य उपचार सुरू होते. डॉक्‍टरांवर त्याने आरोप केले, तरी याबाबत मनात कोणीही कटुता न ठेवता डॉक्‍टरांनी त्याच्यावर अतिशय काळजीपूर्वक उपचार केलेत. प्रशासनाचीही त्याला सोबत मिळाली. या सर्वांची फलश्रृती म्हणून आज अमोल 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' होऊन घरी परतला. मात्र, रुग्णालयातून निरोप घेताना त्याने जिल्हा प्रशासन व वैद्यकीय महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेला प्रत्येकच रुग्ण अतिशय महत्वाचा आहे. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांना कोरोनामुक्त करणे, यालाच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रुग्णांबाबत कोणताही भेदभाव केला जात नाही. प्रत्येकाला योग्य उपचाराअंती सुखरूप घरी सोडणे, यासारखा दुसरा आनंद नाही. गंभीरावस्थेत असलेल्या अमोल व्हडगिरेला बरे करण्यात वैद्यकीय महाविद्यालयाने चांगली मेहनत घेतली. त्यामुळे संपूर्ण डॉक्‍टर्स, नर्स व इतर स्टाफचे अभिनंदन. 15 दिवसांनंतर अमोल बरा होऊन घरी जात असल्याचा आनंद आहे.
-एम. डी. सिंह जिल्हाधिकारी, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com