खा. नवनीत राणा काँग्रेसपासून दुरावताहेत का?

rana.jpg
rana.jpg

अमरावती : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दिलेल्या पाठिंब्यावर अमरावती लोकसभा मतदार संघातून नवनीत राणा निवडून आल्या. परंतू मागील काही कालावधीपासून त्या या आघाडीपासून दूर जात असल्याचेच दिसून येत आहे. पाच महिन्यांपुर्वी काँग्रेस मेळाव्यात राणांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठेचे वचन घेतले होते. राणा यांनी ते वचन मोडल्याचा आरोप आता होत आहे.

सोमवारी अमरावतीत काँग्रेसची सभा झाली. माणिकराव ठाकरे यांनी सुरुवातीला राणा यांना निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त करताना त्यांचा फायदा काँग्रेसला होईल, असे सांगताच मंचावरील आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांना मध्येच रोखले. खासदारांचे नाव कशाला घेता, त्यांनी दगा दिला, असे त्यांनी म्हणताच, कार्यकर्त्यांनी राणा भाजपात पळाल्या, अशी आरडाओरड सुरू केली. अखेरीस भान राखून माणिकराव ठाकरे यांना भाषणाचा रोख बदलावा लागला.

गेल्या पाच महिन्यांमध्ये काय बदल झाला, याची चर्चा आता सुरू झाली आहे. लोकसभेवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता. त्या विजयी झाल्यावर भाजपमध्ये तर जाणार नाहीत, तसेच जिल्ह्यातील राजकारणात ढवळाढवळ करून विधानसभा निवडणुकीत दर्यापूर, मेळघाटमध्ये काँग्रेससमोर अडथळे तर निर्माण करणार नाहीत, अशा शंकांचे निरसन करून काँग्रेसने आमदार रवि राणा आणि नवनीत राणा यांच्याकडून एकनिष्ठेचे आश्वासन घेतले होते.

नवसारीत मेळाव्यात बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी राणा या निवडून आल्यावर भाजपसोबत गेल्या, तर हा  कार्यकर्त्यांसोबत मोठा घात होईल, अशी भीती व्यक्त केली होती. यशोमती ठाकूर यांनी देखील रवी राणा हे मुख्यमंत्र्यांशी जवळीक दाखवतात, असा चिमटा काढून राणा यांनी काँग्रेस विचारधारेशी प्रामाणिक रहावे, असे आवाहन केले होते. त्यावर  नवनीत राणा यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपात जाणार नाही, असे वचन दिले होते. आम्हाला अमरावतीत अडसूळांचा पराभव करायचा नसून देशात मोदींचा पराभव करायचा आहे, असे त्यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला होता. दुसरीकडे, आपण अपक्ष आमदार असल्याने लोकांच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे जावे लागते, असा खुलासा रवि राणा यांनी केला होता.

विजयी झाल्यानंतर लगेच नवनीत राणा यांचा कल भाजपकडे असल्याची टीका काँग्रेस नेत्यांकडून होऊ लागली होती. राणा दाम्पत्याने भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांच्या भेटी घेण्याबरोबर काँग्रेसपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केल्याने काँग्रेस पदाधिकारी नाराज झाले. ही नाराजी सोमवारी काँग्रेसच्या सभेत उघड झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com