विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅगमध्ये मोबाईल कशासाठी?

file photo
file photo

अमरावती : इंग्रजी माध्यमांच्या नव्हे तर इतरही नामांकित शाळेत शिकणारे अल्पवयीन विद्यार्थी स्कूल बॅगमध्ये ऍण्ड्रॉइड मोबाईल ठेवत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पालकांसह शिक्षकांचीदेखील चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे चाइल्ड पोर्नोग्राफीची धास्ती आता वाढली असून पोलिसांनी चार गुन्हे दाखल केल्यावर पालकांमध्येसुद्धा चांगलीच खळबळ उडाली आहे. 
कमी वयामध्ये सोशल मीडियाचा कशा पद्धतीने वापर करायचा याची परिपूर्ण माहिती लहान मुलांना नसते, त्यामुळे नकळत त्यांच्या हातून चुका होतात, अनेक जण त्या मुलांना इमोशनल ब्लॅकमेल करतात, समज नसलेली ही मुले अशा लोकांच्या जाळ्यात नकळत अडकत जातात. हे यंत्र प्रचंड वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे अत्याधुनिक मोबाईलचा वापर कशासाठी, कोणत्या वयात करायचा याबाबतची माहिती शाळांसह, पालकांनीही त्यांच्या पाल्यांच्या मनावर बिंबविणे गरजेचे झाले आहे. 

शिक्षकांनी हटकले..अन्‌ पालक अडले

एका नामांकित इंग्रजी शाळेत नवव्या वर्गातील विद्यार्थ्याजवळ ऍण्ड्रॉईड मोबाईल दिसला. वर्गशिक्षकाने विद्यार्थ्यास हटकले. पालकास शाळेत बोलावून मोबाईल देऊ नका, अशी विनंती केली. परंतु त्या पालकाने सेफ्टीसाठी मोबाईल दिल्याचे गाऱ्हाणे शिक्षकांपुढे मांडले.

दहावीपर्यंत मोबाईलची गरज नाही

तंत्रज्ञानापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवता येणार नाही. परंतु त्याचे फायदे व तोटे समजण्यासाठी समुपदेशन आवश्‍यक आहे. शाळा आणि पालक यांची भूमिका त्यासाठी महत्त्वाची ठरते. शाळेतील विद्यार्थ्यांजवळ मोबाईल देणे गरजेचे नाही, असे पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी सांगितले. 

रडणे थांबविण्यासाठी मोबाईल कशाला हवा?

मूल्यशिक्षण देण्याचा विसर पडतोय, दोन वर्षांच्या बाळाचे रडणे थांबविण्यासाठी त्याच्याहाती मोबाईल दिल्या जातो. कालांतराने हाच प्रकार त्याची सवय होते. त्यापासून रोखणे नंतर कठीण होते. जागतिक आरोग्य संघटनेने या प्रकाराला मानसिक व्याधींच्या कक्षेत टाकलंय, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश अग्रवाल यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com