Video : टॉयलेटला श्रद्धांजली का वाहताहेत महिला? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

गर्जना जनक्रांती संघटनेच्या आम्रपाली गवई सक्रिय कार्यकर्त्या. त्यांनी तडक या संघटनेच्या अध्यक्षा अर्चना ऊर्फ रेशूम भोयर यांच्यासोबत संपर्क केला आणि गांधीगिरीचा "प्लॅन' निश्‍चित झाला. वेळ सायंकाळी सहाची ठरली. मिळून साऱ्याजणी जमायला लागल्या. मीनाक्षी धडाडे, प्रीती दलाल, रेखाताई दलाल, अनुष्का गवळी, दर्शना पाटील भराभरा पोहोचल्या. अर्चना भोयरही पोहोचल्या. येथे काय करायचे, हे फक्त आम्रपाली आणि अर्चना मॅडम यांच्याव्यतिरिक्त कुणालाच ठाऊक नव्हते. दरम्यान, अर्चना भोयर यांनी "सकाळ'च्या बातमीदारांना बोलावून घेतले. बातमीदार पोहोचताच गांधीगिरी सुरू झाली. 

नागपूर : नागपूर हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर. असे म्हणतात की, ते आता "स्मार्ट सिटी' वगैरे होणार. याच शहरातील प्रसिद्ध बैद्यनाथ चौक. आशीर्वाद सिनेमागृहही अगदी लागूनच. नागपूरचे मुख्य बसस्थानक हाकेच्या अंतरावर. याच चौकातून अनेक शहरांना जाणाऱ्या खासगी "ट्रॅव्हल्स'ची कार्यालयेही येथेच. म्हणजे प्रचंड वर्दळ. इथे एक नावाला महिला प्रसाधनगृह. पण, ते दिवसरात्र कुलूपबंद. रस्त्याने ये-जा करणारे पुरुष येथे अलबत थांबतात. या प्रसाधनगृहाच्या एका भागाला खुशाल लघवी करून निघून जातात. महिला मात्र थबकतात. त्यांच्यासाठी असलेले प्रसाधनगृहच बंद. कशा जाणार त्या? कुठे जाणार त्या? आम्रपाली गवई या मार्गाने रोज जाणे-येणे करतात. त्यांच्या नजरेतून महिलांची ही तगमग आणि कुचंबणा सुटायची नाही. आज 19 नोव्हेंबर- "वर्ल्ड टॉयलेट डे'. हे हेरून त्यांनी एक अफलातून गांधीगिरी करण्याचा निश्‍चय केला. 

कुणालाच नव्हती खबरबात 
गर्जना जनक्रांती संघटनेच्या आम्रपाली गवई सक्रिय कार्यकर्त्या. त्यांनी तडक या संघटनेच्या अध्यक्षा अर्चना ऊर्फ रेशूम भोयर यांच्यासोबत संपर्क केला आणि गांधीगिरीचा "प्लॅन' निश्‍चित झाला. वेळ सायंकाळी सहाची ठरली. मिळून साऱ्याजणी जमायला लागल्या. मीनाक्षी धडाडे, प्रीती दलाल, रेखाताई दलाल, अनुष्का गवळी, दर्शना पाटील भराभरा पोहोचल्या. अर्चना भोयरही पोहोचल्या. येथे काय करायचे, हे फक्त आम्रपाली आणि अर्चना मॅडम यांच्याव्यतिरिक्त कुणालाच ठाऊक नव्हते. दरम्यान, अर्चना भोयर यांनी "सकाळ'च्या बातमीदारांना बोलावून घेतले. बातमीदार पोहोचताच गांधीगिरी सुरू झाली. 

कुलूप, खड्डे आणि झेंडूची फुले 
रोटरी आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रसाधनगृह उभारण्यात आले होते. असे म्हणतात की, या प्रसाधनगृहाची जबाबदारी महिन्याकाठी 1500 रुपये देऊन एका गरीब महिलेला देण्यात आली होती. परंतु, स्वच्छता होत नसल्याने प्रचंड दुर्गंधी. त्यामुळे येथे देखरेखीसाठी कुणीच टिकले नाही. आजूबाजूला रिक्षाचालकही थांबलेले असतात. त्यांनी दुर्गंधीमुळे दुसरीकडे बस्तान मांडले.

अशा या दुर्गंधीयुक्त आणि बंद पडलेल्या प्रसाधनगृहाजवळ अर्चना भोयर त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोहोचल्या, तर कुलूप लावलेले. त्यांनी मग झेंडूच्या फुलांचा हार काढला. तो कुलूपबंद प्रसाधनगृहाला घातला. प्रसाधनगृहाच्या "एंट्री'जवळच एक खड्डा पडला होता. त्यात फुलेही वाहिली. दोन मिनिटे मौन श्रद्धांजलीही व्यक्त केली. "सकाळ'च्या बातमीदारांनी हे सर्व "कॅमेरा'बद्ध केले. तर, "टॉयलेट'ला श्रद्धांजली वाहून अफलातून "गांधीगिरी' गर्जना संघटनेच्या भगिनींनी केली. 

Image may contain: 13 people, people smiling, people sitting
 सामाजिक कार्यकर्त्या अरुणाताई सबाने यांच्या नेतृत्वात तत्कालीन महापौर नंदा जिचकार यांना "आम्ही जावे कुठे?' असा प्रश्‍न करताना महिला प्रतिनिधी. 

महापौर मॅडम म्हणाल्या, मी देईल निधी 
नागपूरच्या तत्कालीन महापौर नंदा जिचकार यांना महिलांचे एक मोठे शिष्टमंडळ भेटले. ""महिलांसाठी पुरेशी प्रसाधनगृहे तुम्ही का उपलब्ध करून देत नाहीत?' असा प्रश्‍न त्यांना विचारला. त्यांनी लागलीच अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलविली आणि एक आदेश काढला. "नागपूर शहरातील सर्व नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात महिलांसाठी किती प्रसाधनृहे आवश्‍यक आहेत, याची संख्या काढावी' असे महापौरांनी सांगितले. "महापौर निधीतून मी महिलांच्या प्रसाधनगृहांसाठी स्वतः तरतूद करेल' असे आश्‍वासनही त्यांनी दिले होते. 

Image may contain: 14 people, people sitting and indoor
"आम्ही जावे कुठे?' या अभियानाबाबत माहिती समजावून सांगताना "सकाळ' नागपूर आवृत्तीचे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे. 

"लाखो महिला रोज रस्त्यावर, त्यांनी जावे कुठे?' 
अर्चना भोयर यांना याबाबतीत विचारले. त्या संतापल्या होत्याच. म्हणाल्या, ""देशभरात "राइट टू पी' आंदोलन सुरू आहे. नागपूर शहराने यातून धडा घ्यायला हवा होता. 30 लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात अर्धे जग महिलांचे आहे. यातील लाखो महिला रोज कामाच्या निमित्ताने, खरेदीच्या निमित्ताने रस्त्यावरून ये-जा करतात. मग त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात "टॉयलेट' उपलब्ध असायला हवेत की नाही?'' 

Image may contain: 24 people, people smiling, people standing and outdoor
आम्ही जावे कुठे ?

आम्ही जावे कुठे? एकच सवाल, फुंकला बिगूल 
दैनिक "सकाळ'ने अलीकडेच "आम्ही जावे कुठे?' हे अभियान सुरू केले. त्याच्या अनेक बैठका आजवर झाल्या. "सकाळ' कार्यालयात झालेल्या बैठकीला नागपूर शहरातील विविध समाजसेवी संघटना आणि कार्यकर्त्या, आंदोलक महिला, नेत्या सहभागी झाल्या. नागपूर शहरात पुरेसे "टॉयलेट' उभारण्याचे अभियान सुरू करण्यासाठी त्यांनी बिगूल फुंकला.

Image may contain: 5 people, people sitting and indoor
महिलांच्या प्रसाधनगृहाबाबत मंथन करण्यासाठी दैनिक "सकाळ'च्या वतीने आयोजित खास बैठकीत महिला प्रतिनिधी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why womens of nagpur doing gandhigiri?