पत्नीने केला पतीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

बॅंकेत वरिष्ठ व्यवस्थापक असलेल्या पतीने शारीरिक व मानसिक छळ करीत पत्नीवर बलात्कार केला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

नागपूर - बॅंकेत वरिष्ठ व्यवस्थापक असलेल्या पतीने शारीरिक व मानसिक छळ करीत पत्नीवर बलात्कार केला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

आरोपी पती अब्दुल (बदललेले नाव) हा रामदासपेठमधील एका बड्या बॅंकेत मॅनेजर आहे तर पीडित पत्नी मीरा (बदललेले नाव) ही मोमीनपुऱ्यातील एका नामांकित शाळेत शिक्षिका आहे. अब्दुलचे पहिले लग्न औरंगाबाद येथील एका तरुणीशी झाले होते. त्यांचा घटस्फोट झाला. अब्दुलने "शादी डॉट कॉम' या वेबसाइटवर आपली प्रोफाइल टाकली. त्यानंतर सप्टेंबर 2018 रोजी घटस्फोटित असलेल्या मीराने अब्दुलला फोन केला. भेटण्याची इच्छा व्यक्‍त केली. भेट झाल्यानंतर दुसरे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी फेब्रुवारी 2019 मध्ये लग्न केले. लग्नानंतर आठवड्याभरातच अब्दुलने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास होईल अशा पद्धतीने मीराशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणे सुरू केले. रोज मारहाण आणि शारीरिक संबंधासाठी त्रास देणे सुरू केले. पतीचा त्रास असह्य झाल्याने ती लग्नाच्या 14 दिवसांनंतर माहेरी निघून गेली. या प्रकरणी तिने पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार मानकापूर पोलिसात केली. पोलिसांनी अब्दुलविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पत्नीवर खंडणीचा गुन्हा दाखल 
मीरा हिने पतीला सोडचिठ्‌ठी देण्यासाठी 50 लाखांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास बॅंकेत येऊन मारहाण करण्याची धमकी दिली होती. घाबरून अब्दुलने पोलिस आयुक्‍तांची भेट घेऊन तक्रार केली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच मीरा व तिचा साथीदारावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. 

पत्नीच्या विमानवाऱ्या 
मीरा ही पतीला न सांगता वारंवार विमान प्रवास करून मुंबईला जात होती. दोन दिवस राहिल्यानंतर परत येत होती. तिला अनेक "हायफाय' शौक आहेत. त्यासाठी लागणारा पैसा उकळण्याचा बेत मीराचा होता. मात्र, पतीने तिला पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तिने बलात्काराची तक्रार दिल्याची माहिती मानकापूर पोलिसांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife filed a rape case against her husband