पती रोज तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा...मग पत्नीने काढला त्याचा काटा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

गणेशचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला. पत्नीच्या चारित्र्यावर तो संशय घ्यायचा. पोलिस तपासात या व्यक्तीची हत्या त्याच्या पत्नीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या नाकातोंडावर उशी ठेवून श्‍वास रोखून त्याला मारल्याचे तिने कबूल केले.

भद्रावती (जि. चंद्रपूर) : शहरातील किल्ला वॉर्डातील गणेश वाटेकर याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. पोलिस तपासात या व्यक्तीची हत्या त्याच्या पत्नीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे.

 

गणेशचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना दीड वर्षांची मुलगी आहे. गणेशचे शिक्षण त्याच्या पत्नीपेक्षा कमी होते. सोबतच पत्नीच्या चारित्र्यावर तो संशय घ्यायचा. यातूनच त्यांच्यात रोज खटके उडायचे. त्यामुळे पत्नी अनेकदा माहेरीसुद्धा निघून गेली होती.

 

गळफास लावल्याचा केला बनाव

काही दिवसांपूर्वीच गणेशच्या आई-वडिलांनी त्यांना वेगळे राहण्यास सांगितले. तो किल्ला वॉर्डातच भाड्याने राहत होता. दरम्यान 21 मे रोजी रात्री बारा वाजताच्या दरम्यान गणेशने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पत्नीने शेजाऱ्यांना दिली. शेजारी घटनास्थळी पोहोचले. तेव्हा गणेश पलंगावर मृतावस्थेत पडून होता. छताला एका दोर लटकलेला होता. थोड्याच वेळात पोलिसही तेथे पोहोचले. पोलिसांनी मर्ग दाखल केला.

असं घडलंच कसं : जंगलात जाऊन तेंदूपाने केले गोळा अन् कुटुंबाच्या मदतीने तयार केले मुडके; मात्र, केंद्रावर घडला हा प्रकार...

अन्‌ पत्नी पोपटासारखी बोलू लागली

दुसरीकडे मृताचा भावाने घातपात झाल्याची तक्रार दिली होती. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्‍या दाखविताच तिने पतीचा खून केल्याची कबुली दिली. तिने पतीचे दोन्ही हात बांधले. त्याच्या नाकातोंडावर उशी ठेवून श्‍वास रोखून त्याला मारल्याचे तिने कबूल केले. तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the wife killed her husband