पत्नीने केला दुसरा घरोबा.... रागाच्या भरात पतीने उचलले हे पाऊल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 डिसेंबर 2019

दोघांनी लग्न केले. परंतु, एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली. नातेवाइकांनी त्याचा जामीन घेतला नाही. त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, संदीपच्या नातेवाइकांनी रितूला घरात ठेवले नाही. त्यामुळे ती पुन्हा निराधार झाली. 

भंडारा : तुरुंगातून सुटून बाहेर येताच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला त्याच्या पत्नीने दुसरा घरोबा केल्याचे कळले. यावरून रागाच्या भरात तिला घराबाहेर ओढत आणून भरचौकात काठीने बेदम मारहाण केली. उपचारासाठी रुग्णालयात येताना तिचा जीव गेला. ही घटना अड्याळ जवळील मिन्सी येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.
 

Image may contain: 2 people, selfie and closeup
संदीप तांडेकर व रितू

 

मिन्सी येथील संदीप संजय तांडेकर (वय 28) हा गुन्हेगारीत लिप्त असायचा. तो सतत भटकंती करत राहतो. यादरम्यान गेल्या वर्षी परजिल्ह्यात गेला असताना त्याला निराधार असलेली रितू (वय 19) भेटली. तिच्या प्रेमात पडलेल्या संदीपने तिला आपल्यासोबत गावी मिन्सी येथे आणले. दोघांनी लग्न केले. परंतु, एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली. नातेवाइकांनी त्याचा जामीन घेतला नाही. त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, संदीपच्या नातेवाइकांनी रितूला घरात ठेवले नाही. त्यामुळे ती पुन्हा निराधार झाली. 

Image may contain: one or more people, people standing and outdoor
घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिस

हेही वाचा - Video : साठ वर्षे शेतात राबला हा पोशिंदा, आता झाला सेवानिवृत्त

तुरुंगातून सुटताच केला पत्नीचा खून 
गावात मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणारा शशिकांत रंगारी याने तिला मदत केली. यामुळे दोघेही जवळ आले. त्यानंतर शशिकांतने जवळच्या गावातील बुद्ध विहारात तिच्यासोबत लग्न केले. पहिला पती कारागृहात गेला असला तरी, रितूला आता शशिकांतचा आधार मिळाला होता. परंतु, शुक्रवारी संदीपला कारागृहात सुटी मिळाली. तो सायंकाळी गावात आला. तेव्हा त्याच्या गैरहजेरीत पत्नीने दुसरा घरोबा केल्याचे कळले. यामुळे तो तसाच शशिकांत रंगारी याच्या घरी गेला. 

काठीने बेदम मारहाण, मिन्सी येथील थरार 
तिथे रितू एकटीच होती. त्याने तिला घरातून ओढतच गावातील चौकात आणले. गावकऱ्यांना काही कळायच्या आत त्याने तिला काठीने बेदम मारहाण केली. यात तिच्या डोके, तोंडावर गंभीर जखमा झाल्या. ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडली. तेव्हा तो घटनास्थळाहून पळून गेला. यात गंभीर जखमी झालेल्या रितूला तिचा पती व गावकऱ्यांनी उपचारासाठी दुचाकीवरून पहेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु, आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे तिला रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असल्याने डॉक्‍टरांनी प्राथमोपचार करून तिला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. रात्री नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमी रितूचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. 

क्लिक करा - विदर्भात ईथे आहे मुख्यमंत्र्यांचे आजोळ...

रुग्णवाहिका चालकाचा हेकेखोरपणा 
शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता जखमी रितूला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्‍टरांनी तिला त्वरित नागपूर येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तिचा जीव वाचविण्यासाठी नातेवाइकांनी डॉक्‍टरांकडे 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यासाठी लाखनी येथील रुग्णवाहिका पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु, तेथील रुग्णवाहिकेच्या चालकाने जेवण करून एक तासाने येतो असे फोनवर सांगत होता. त्यामुळे रात्री साडेआठ वाजेपासून पावणेदहा वाजेपर्यंत जखमी रितू तडफडत होती. नागरिकांना अतीआवश्‍यक सेवेतील डॉक्‍टर आणि रुग्णवाहिकेची सेवा वेळेवर मिळत नाही, हेच यातून पुन्हा एकदा दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife marry to another guy husband got angry