प्रियकर घरात दिसल्याने पत्नीचा खून

प्रियकर घरात दिसल्याने पत्नीचा खून

नागपूर - घरात पत्नी प्रियकरासोबत दिसल्याने भडकलेल्या पतीने तिच्या डोक्‍यात तवा घालून खून केला. ही थरारक घटना आज शनिवारी पहाटेच्या सुमारास अंबाझरीत उघडकीस आली. भावना देवीदास रंभाजी ऊर्फ धुर्वे (वय ३२, रा. एनआयटी ले-आउट, अंबाझरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर देवीदास ऊर्फ देवा बापूराव रंभाजी (वय ४०) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी बारा तासांत आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवा रंभाजी हे मूळचे चंद्रपुरातील असून मच्छी विक्रीच्या व्यवसायासाठी ते नागपुरात आले होते. पत्नी भावनासह गेल्या पाच वर्षांपासून अंबाझरीत राहतात. देवा यांचे प्रतापनगरात मच्छी विक्री केंद्र आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांत एका युवकाशी असलेल्या अनैतिक संबंधावरून वाद सुरू होता. भावनाचे वस्तीत राहणाऱ्या एका युवकासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय देवाला होता. शुक्रवारी तो रात्री अकरा वाजेपर्यंत प्रतापनगरात मच्छी विक्री करीत होता. 

दरम्यान, भावनाने प्रियकराला घरी बोलावले. पती रात्री उशिरा घरी येणार असल्यामुळे भावना बिनधास्त होती. मात्र, पती रात्री दहा वाजताच घरी पोहोचला. त्याने दार ठोठावले तर पत्नीने दार उघडले नाही. शेवटी त्याने धमकी देताच भावनाने दार उघडले. घरात दोघेही दिसल्यामुळे पतीचा पारा चढला. त्याने लगेच किचनमधील लोखंडी तवा उचलला आणि पत्नीच्या डोक्‍यात घातल्याची कबुली आरोपी देवाने पोलिसांना दिली. भावना रक्‍ताच्या थारोळ्यात पडली. घरमालकाच्या प्रकार लक्षात आला. त्यांनी अंबाझरी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून देवा रंभाजीला अटक केली. 

भावनाने केले होते दुसरे लग्न 
भावना गेल्या आठ वर्षांपूर्वी पहिल्या पतीपासून विभक्‍त झाली होती. त्यानंतर तिने देवाशी घरोबा केला. दोघांनी प्रेमविवाह केला. भावनाला पहिल्या पतीपासून १४ वर्षांचा मुलगा आहे. दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना ‘तिसऱ्या’ने त्यांच्या जीवनात एंट्री केली. त्यामुळे भावनाचा तोल गेला. 

यापूर्वीही डोक्‍यात कूकर घातला होता
दुचाकीवर मासोळ्याचे कॅरेट घेऊन देवा प्रतापनगरातील दुकानात गेला. मात्र, कॅरेटमधून काही मासोळ्या पडल्या. ती बाब दुकानात गेल्यावर देवाच्या लक्षात आली. नाइलाजाने त्याने राहिलेल्या मासोळ्या विकून घर गाठले. घर गाठल्यानंतर घरात वेगळाच प्रकार समोर आला. यापूर्वीही २०१६ मध्ये भावनाच्या डोक्‍यात कूकर घालून खून करण्याचा प्रयत्न देवाने केला होता. तो गुन्हा ठाण्यात दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com