गर्भवती असलेल्या पत्नीचा पतीने संशयातून केला खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

दीपाली होती एसटीत कंडक्‍टर
उच्चशिक्षित असलेली दीपाली ही एसटी विभागात कंडक्‍टर म्हणून कार्यरत होती. ती पांढरकवडा आगारात कार्यरत होती. एमआर असलेल्या योगेश व दीपाली यांना रविवारी सुटी असल्याने आठवड्यातून एकदा ते सोबत राहत होते. परंतु, ती गर्भवती असल्याचे कळताच त्याने ‘ते’ बाळ स्वीकारण्यास नकार दिला होता, अशी माहिती आहे.

नागपूर - चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीच्या गर्भात अन्य पुरुषाचे बाळ असल्याचा संशय असल्यामुळे पतीने पत्नी दीपाली ऊर्फ रोशनी योगेश राऊत (३०, रा. भानोदानगर, झिंगाबाई टाकळी) हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पती योगेश नत्थू राऊतवर मेयोत उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजता मानकापुरात उघडकीस आली.

योगेश नामांकित फार्मा कंपनीत एमआर आहे. तो पत्नी दीपालीसह झिंगाबाई टाकळी परिसरात किरायाने राहतो. गेल्या वर्षीच त्यांचे लग्न झाले.

दीपाली चार महिन्यांची गर्भवती होती. तो दीपालीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दीपाली व युवकाचे प्रेमप्रकरण सुरू असून त्याच युवकाचे बाळ दीपालीच्या गर्भात वाढत असल्याचा संशय त्याला होता. याच कारणावरून पती-पत्नीत अनेकदा वाद झाला होता.

११ मे रोजी दुपारी दीड वाजता दीपाली व योगेश यांच्यात पुन्हा वाद झाला. त्याने रागाच्या भरात दीपालीचा गळा आवळून खून केला. जवळपास सायंकाळपर्यंत तिच्या मृतदेहाजवळ तो बसून होता. पोलिस पकडतील व कारागृहात जावे लागेल या भीतीपोटी त्यानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार घरमालकाच्या लक्षात येताच त्यांनी लगेच पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी दोघांनाही मेयोत दाखल केले.

दीपालीला डॉक्‍टरांनी मृत घोषित केले तर योगेशवर उपचार सुरू आहे. दीपालीचे वडील अशोक होरे (रा. बरडगाव, जि. यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी योगेश राऊतवर पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Wife Murder Husband Suicide Trying Crime