वन्यप्राण्यांचा हैदोस रोखणारे स्वयंचलित यंत्र

अकोला - वन्य प्राण्यांना घाबरविणाऱ्या यंत्राची पाहणी करताना कुलगुरू डॉ.विलास भाले, संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे व विद्यापीठाचे अधिकारी.
अकोला - वन्य प्राण्यांना घाबरविणाऱ्या यंत्राची पाहणी करताना कुलगुरू डॉ.विलास भाले, संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे व विद्यापीठाचे अधिकारी.

अकोला - पिकांमधील वन्य प्राण्यांचा हैदोस सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र बार्शीटाकळी तालुक्‍यात कान्हेरी सरप येथील शेतकरीपुत्र योगेश सरप यांनी, स्वतःच या समस्येवर उपाय शोधला असून, त्यासाठी त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारे वन्य प्राण्यांना घाबरविणारे स्वयंचलित यंत्र तयार केले आहे.

योगेश सरप यांचे वडील मधुकरराव सरप, कान्हेरी सरप येथे अनेक वर्षापासून सेंद्रिय शेती करतात. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार कमी खर्चाचे परंतु अधिक उत्पादन देणाऱ्या पौष्टिक शेतमालाच्या उत्पादनावर त्यांचा भर असतो. या भागात निलगाय, रानडुकरे, हरीन, काळविटांचा प्रचंड वावर असल्याने, त्यांना व परिसरातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले मात्र, ठोस उपाय सापडला नाही. सातत्याने होणारे नुकसान पाहून त्यांचा मुलगा योगेश सरप यांनी, स्वतःच काहीतरी संशोधन करण्याचा निश्‍चय केला आणि वन्य प्राण्यांना घाबरविणारे, सौर ऊर्जेवर चालणारे स्वयंचलीत यंत्र तयार केले. त्यामुळे त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांचा वावर कमी झाला असून, आता ज्वारीचे डौलदार पीक पाहायला मिळत आहे.

साडेतीन हजारांत निर्मिती
एक सोलर प्लेट, बॅटरी, एम्लिफायर, मेमरीकार्ड, कार्ड रिडर, लोखंडी स्टॅंड, एवढ्या साहित्यांतून योगेश सरप यांनी हे यंत्र तयार केले आहे. यासाठी त्यांना साडेतीन हजार रुपये खर्च आला असून, सतत सहा तास ते काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

असे घाबरविते यंत्र
योगेश सरप यांनी एका मेमरी कार्डमध्ये वन्य प्राण्यांना घाबरविणारे, कुत्रे, फटाके, बंदुक, ढोल-ताशे, मनुष्याचे ओरडणे, असे अनेक आवाज भरले आणि ते कार्डरिडरद्वारे ते यंत्राला जोडले. रात्री दर दहा मिनिटांनी हे आवाज सुरू होतात व दहा मिनिटांनी बंद होतात. त्यामुळे वन्य प्राणी घाबरून शेतात प्रवेश करीत नाहीत.

कुलगुरूंनी थोपाटली पाठ
योगेश सरप यांनी तयार केलेल्या वन्य प्राण्यांना घाबरविणाऱ्या यंत्राची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले व संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी स्वतः शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यानेच स्वयंसंशोधनातून शोधलेला हा उपाय पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला; तसेच सरप यांची कौतुकाने पाठ थोपटली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com