#SaveTrees मुख्यमंत्री 'आरे'प्रमाणेच नागपुरातील वृक्षतोड थांबवणार का? 

केवल जीवनतारे
Sunday, 8 December 2019

दिव्यांग बांधवांना साहित्यापासून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया एकाच छताखाली व्हावी, यासाठी मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात तयार होणाऱ्या दिव्यांग विभागीय संमिश्र समायोजन (कंपोजिट रिजनल सेंटर) केंद्राचे दोन वर्षांपूर्वी मेडिकलमध्ये भूमिपूजन झाले.

नागपूर : मुंबईच्या आरे प्रकल्पात जसे वृक्षतोड थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, त्याच धर्तीवर नागपूरच्या मेडिकलमध्ये दिव्यांग विभागीय संमिश्र समायोजन केंद्रासाठी वृक्षतोड होणार आहे. येथील वृक्षांचा श्‍वास धोक्‍यात आला आहे. मात्र आता सरकार बदलले, पर्यावरणवाद्यांनी ही वृक्षतोड थांबवण्यासाठी पुढे यावे, अशी मागणी जोर धरत आहे. 

कंपोजिट रिजनल सेंटरसाठी होणार कत्तल 
दिव्यांग बांधवांना साहित्यापासून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया एकाच छताखाली व्हावी, यासाठी मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात तयार होणाऱ्या दिव्यांग विभागीय संमिश्र समायोजन (कंपोजिट रिजनल सेंटर) केंद्राचे दोन वर्षांपूर्वी मेडिकलमध्ये भूमिपूजन झाले. विशेष असे की, तत्कालीन अधिष्ठात्यांनी भगवती आयोगाचा हवाला देत जागा उपलब्ध करून देता येत नसल्याचे कारण दिले होते. परंतु, विशेषाधिकार वापरून जिल्हा प्रशासनाने येथील जागेवर भूमिपूजन केले. टीबी वॉर्ड परिसरात पाच एकरांत हे केंद्र उभारले जाणार आहे.

Image may contain: tree, outdoor and nature
नागपूर : दाट वनराईचा मेडिकल परिसर.

 

ज्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अखत्यारित ही जागा आहे, त्या मंत्र्यांनादेखील भूमिपूजनाच्या कार्यक्रमापासून वंचित ठेवण्यात आले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, संचालक आणि मेडिकलच्या अधिष्ठात्यांचा नामोल्लेख त्या पत्रिकेत नव्हता.

महत्त्वाची बातमी - काय? ऐतिहासिक वास्तूला लागली "तहान'

आठवे केंद्र नागपुरात सुरू होणार 
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत असताना त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव देणे, दिव्यांग समायोजनासाठी जागृती करणे, उत्तम प्रकारचे कुशल मनुष्यबळ तयार करणे, दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण देणे, पुनर्वसनासाठी केंद्र व राज्याच्या योजनांची मोट बांधणे यासाठी या कंपोजिट रिजनल सेंटरचा आराखडा तयार करण्यात आला.

देशात असे सात राष्ट्रीय केंद्र कार्यरत आहेत. आठवे केंद्र नागपुरात सुरू होणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रिसर्च ऍण्ड ह्युमन रिसोर्सेसतर्फे हे केंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी सुरक्षा भिंत बांधण्यात येत आहे. 

जागेची किंमत 100 कोटी 
बाजारमूल्यानुसार 32 कोटी आणि सरकारी दरानुसार 100 कोटी रुपये मूल्य असलेली ही पाच एकर जागा एक रुपया दरात केंद्र सरकारच्या या प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या जागेसाठी बराच विरोध झाला होता. या केंद्रासाठी मेडिकलशी संलग्न 22 हजार 300 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जागेच्या हस्तांतरणासंदर्भात अध्यादेश काढून जागा हस्तांतरणाची प्रक्रिया झाली. 

500 वृक्ष तोडले जाणार 
मेडिकलमध्ये ट्रॉमा सेंटरसाठी 500 वृक्ष तोडले. याशिवाय येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू आहे. या कंपोजिट रिजनल सेंटरसाठी सुमारे साडेचारशेवर वृक्ष तोडण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ही वृक्षतोड थांबविण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी पुढे यावे तसेच निवासी गाळ्यांच्या पुढे हा प्रकल्प हलवण्यात यावा असे वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संस्थेचे (इंटक) अध्यक्ष त्रिशरण सहारे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will CM uddhav thakrey stop the tree-cutting of Nagpur like Aare?