वीजकेंद्रांना मिळणार पुरेसा कोळसा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

वीजकेंद्रांना मिळणार पुरेसा कोळसा
नागपूर : महाराष्ट्रात वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा पुरेसा व नियमित पुरवठा करावा, यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोळसामंत्री पीयूष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली. वेकोलिकडून कोळसा पुरवठ्याची कोणतीही अडचण महाराष्ट्राला येणार नाही, असे आश्‍वासन पीयूष गोयल यांनी यावेळी दिले.

वीजकेंद्रांना मिळणार पुरेसा कोळसा
नागपूर : महाराष्ट्रात वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा पुरेसा व नियमित पुरवठा करावा, यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोळसामंत्री पीयूष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली. वेकोलिकडून कोळसा पुरवठ्याची कोणतीही अडचण महाराष्ट्राला येणार नाही, असे आश्‍वासन पीयूष गोयल यांनी यावेळी दिले.
वेकोलिच्या कोळसा खाणींजवळील महानिर्मितीच्या वीजनिर्मिती प्रकल्पांना वाहनाने कोळसा पुरवठा करण्याऐवजी पाइप कन्हेयर बेल्टच्या साह्याने सरळ वीजनिर्मिती केंद्रात पोहोचविण्यात यावा. कोराडी, खापरखेडा प्रकल्पांना जवळच्या कामठी, इंदर, गोंडेगाव, सिंगोरी आणि भानेगाव या वेकोलिच्या कोळसा खाणीतून पाइप कन्हेयर बेल्टद्वारे कोळसा पुरवठा शक्‍य आहे. 19 किमीच्या या प्रकल्पासाठी 440 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्राला भटाडीच्या कोळसा खाणीतून पाइप कन्हेयर बेल्टने कोळसा पुरवण्यात यावा. या कामाच्या फलकाचे अनावरण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कामाला आता गती मिळावी, अशी अपेक्षाही बावनकुळे यांनी या चर्चेत व्यक्त केली. या पद्धतीमुळे प्रदूषण आणि खर्च कमी होणार आहे. या विषयासह कामठी रेल्वे स्टेशन आणि जवळच्या रेल्वे स्टेशनच्या समस्यांवरही याप्रसंगी दोन्ही मंत्र्यांची चर्चा झाली.
सावनेर, आदासाच्या प्रश्‍नांवर चर्चा
सावनेर शहरासह परिसराचा 80 टक्के भाग कोळसा खाणीसाठी आरक्षित केल्याने विकास आराखडा मंजूर होऊ शकला नाही. जागा खाणीसाठी आरक्षित झाली. पण, भूसंपादन वेकोलिने केलेले नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक अडचणीत असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले. आदासा खाणीसाठी 205.46 हेक्‍टर जमीन भूसंपादित केली. येथे कोणतीच कामे सुरू नाही. भूसंपादनाबाबतही करार केलेला नाही. हेवती आणि मकरधोकडा या दोन्ही गावांचे पुनर्वसनही झाले नाही. हे दोन्ही विषय लवकर सोडविण्यात यावे, अशी विनंती कोळसामंत्र्यांना त्यांनी केली.

Web Title: will get enough coal