गाडीची "लिफ्ट' हेलिकॉप्टरची बरोबरी करणार? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

- मुख्यमंत्र्यांनी डॉ. रणजित पाटील यांना दिली "लिफ्ट' 
- पाच वर्षांपूर्वी थेट मंत्रिमंडळात मिळाले होते स्थान 
- अकोला जिल्ह्यात भाजपमध्ये दोन गट 
- दोन्ही गटातील वाद मागील पाच वर्षांत विकोपाला 

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 3) अकोला जिल्ह्याचा दौरा केला. अतिवृष्टीने शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी म्हैसपूर येथून गाडीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना "लिफ्ट' दौरा संपेपर्यंत सोबत ठेवले. या प्रसंगाने पाच वर्षांपूर्वी अमरावती येथून बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर जाताना मुख्यमंत्र्यांनी डॉ. रणजित पाटील यांना दिलेली "लिफ्ट' आठवली. त्यावेळची "लिफ्ट' थेट राज्यमंत्रीपदापर्यंत घेऊन गेली होता. पुन्हा मुख्यमंत्र्यांनी दिलेली "लिफ्ट' डॉ. पाटील यांच्यासाठी भाग्यकारक ठरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

भाजप-शिवसेना युतीचे सरकार 2014 मध्ये स्थापन झाले होते. त्यावेळी प्रथमच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा राजतीलक झाला. मंत्रिमंडळाचे गठण सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना तातडीने राज्याचा दौरा करावा लागला. ते हेलिकॉप्टरने अमरावती येथे आले. तेथून त्यांना पुढे बुलडाणा दौऱ्यावर जावयाचे होते. त्यासाठी त्यांनी अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. रणजित पाटील यांना खास अमरावतीला बोलावून घेतले. 

तेथून पुढे ते त्यांना हेलिकॉप्टरमध्ये सोबत घेऊन गेले होते. पुढे मंत्रिमंडळाची घोषणा झाली तेव्हा डॉ. पाटील यांच्याकडे राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले. हेलिकॉप्टरमधील पाच वर्षांपूर्वीच्या "लिफ्ट'ने डॉ. पाटील यांचे भाग्य उजाळले. आता पुन्हा पाच वर्षांनंतर अशीच "लिफ्ट' मुख्यमंत्र्यांनी डॉ. पाटील यांना दिली आहे. आता पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि मुख्यमंत्रिपदी फडणवीस विराजमान झाले तर पुन्हा मंत्रिपदाचा योगायोग जुळून येणार का? अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

अंतर्गत वाद ठरू शकतो अडथळा 
डॉ. रणजित पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर अकोला जिल्ह्यात भाजपमध्ये दोन गट पडले आहे. एक गट डॉ. पाटील यांचा तर दुसरा गट केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचा आहे. दोन्ही गटातील वाद मागील पाच वर्षांत विकोपाला गेला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही या वादाचे पडसाद जिल्ह्यात दिसून आले होते. डॉ. पाटील यांचे निकटवर्तीय असलेले नगरसेवक व माजी जिल्हा परिषद सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णयापर्यंत हा वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे डॉ. पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशात हा वाद सर्वांत मोठा अडथळा ठरू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will the "lift" of the car equal the helicopter?