पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

अमरावती ः आपल्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही, असे आश्‍वस्त करतानाच विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पाच वर्षांच्या कारकिर्दीत पूर्ण करून सिंचन अनुशेष भरून काढल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पंधरा वर्षांत जे झाले नाही ते पाच वर्षांत करून दाखविल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे भाजपच्या महाजनादेश यात्रेस गुरुवारी (ता.एक) प्रारंभ झाला. याप्रसंगी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, राम शिंदे, चंद्रकांत बावनकुळे, आशीष शेलार यांच्यासह मंत्रिमंडळातील बरेच सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते महाजनादेश यात्रेस झेंडी दाखवून प्रारंभ झाला. या वेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधक टीका करतात की आम्ही पाच वर्षांत काय केले, त्यांनी या मुद्द्यावर कोणत्याही व्यासपीठावर यावे आपण चर्चेस तयार आहोत. एक जरी मुद्दा ते खोडून काढू शकले तर पुन्हा जनतेकडे मते मागायला जाणार नाही, अशा शब्दात आव्हान दिले.
मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांतील कामांचा लेखाजोखाच या वेळी मांडला. ते म्हणाले, सिंचन अनुशेषाच्या नावाखाली यांनी घरात पैसा भरला. आम्ही पाच वर्षांत अनुशेष कमी केला. वीजजोडणीचा अनुशेष भरून काढत पाच वर्षांत दीड लाख जोडण्या दिल्या. औद्योगिकवाढीसाठी वीजदरात सवलत दिली. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वांत जास्त रोजगारनिर्मिती महाराष्ट्रात झाली. देशात जेवढी रोजगारनिर्मिती झाली त्यातील 25 टक्‍के राज्यात झाली. दळणवळण गतीमान करण्यासाठी समृद्धी महामार्ग होत आहे. 30 हजार किलोमीटर अंतराचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते बांधून ग्रामीण भाग रस्त्यांना जोडला. 18 हजार गावांत पिण्याच्या पाण्याच्या योजना पोहोचविल्या. शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्राला 18 व्या स्थानाहून देशात तिसऱ्या स्थानी आणले. देशात सर्वाधिक रोजगारनिर्मिती महाराष्ट्रात झाल्याचाही दावा त्यांनी या वेळी केला.
"जनता हीच आमची राजा आहे. जनता आमचं दैवत आहे. आम्ही मालक नाही, सेवक आहोत", असे या वेळी मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आपण केलेली कामे हे जनतेकडे जाऊन सांगायची आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी चाललो आहे. आपण केलेल्या कामांची माहिती देणार आहोत आणि पुन्हा एकदा जनादेश घेऊन सत्तेवर येणार आहोत, असा विश्वास व्यक्त केला.
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, याआधीच्या सरकारमधील नेते जेव्हा दिल्लीला जायचे तेव्हा हात हलवत परत यायचे. पण मी जेव्हा कधी दिल्लीला गेलो तेव्हा मोदींनी मला भरभरून दिलं. मोदींनी महाराष्ट्राला काही कमी पडू दिले नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मोदींचे आभार मानले.
महाजनादेश यात्रेस उपस्थित केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले, देवेंद्र फडणवीस करिश्‍माई मुख्यमंत्री आहेत. भारतातील जनता खेड्यांमध्ये वसते. फडणवीस यांनी शहरी भागातून या यात्रेला सुरुवात न करता गावातून केली. केंद्रीय सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा त्यांनी मांडला. ते म्हणाले, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करूनच दम घेऊ, सर्वांना घरे मिळतील. आगामी पाच वर्षांत प्रत्येक खेडेगाव विमानतळाशी जोडण्यासाठी रस्त्यांचे जाळे विणण्यात येत आहे. तीन तलाकची पद्धत बंद केली, ही मोठी उपलब्धी या सरकारची आहे. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा सत्ता येईल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही याप्रसंगी भाषण झाले. आपल्या भाषणातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना पाच वर्षांत एकही जातीय दंगल झाली नसल्याचा दावा केला. पाच वर्षे अनेक देव पाण्यात बुडवून ठेवलेत, मात्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप एकही निवडणूक हरली नाही. मराठा आरक्षण, धनगर समाजासाठी 1 हजार कोटीच्या सुविधा, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय अशा अनेक कामांचा पाढा त्यांनी या वेळी वाचला.
पालकमंत्री अनिल बोंडे यांनी प्रास्ताविकातून महाजनादेश यात्रेमागील भूमिका विशद करताना ती 155 विधानसभा मतदारसंघातून जाणार असल्याचे सांगितले.
सभास्थळी पाऊस येईल, अशी खबरदारी घेत वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला होता. बैठकव्यवस्था चांगली करण्यात आली होती. मंडपाबाहेरही शेकडो लोक उभे होते. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.

गुरुकुंज मोझरीला "अ' तीर्थक्षेत्राचा दर्जा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधिस्थळ असलेल्या गुरुकुंज मोझरीस तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मोझरीच्या विकासासाठी 100 कोटी रुपये देण्यात येत असल्याचेही त्यांनी घोषित केले. यापूर्वी 141 कोटी रुपये देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com