काहीही हं! कोणत्याही कागदावर नोंद करणार का? वाचा कशाची....

नीलेश झाडे 
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानभरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे अधिकारी कोणत्याही कागदावर नोंद करीत असल्याचे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍यात दिसून आले आहे. यादी आल्यानंतर पक्का पंचनामा तयार होणार आहे. यामुळे पक्‍या पंचनाम्यावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना परत शेतकऱ्यांचे घर गाठावे लागणार आहे, हे मात्र नक्‍की... 

धाबा (जि. चंद्रपूर) : शेतीचे पंचनामे त्वरित करण्याचा दबाब कर्मचाऱ्यांवर आहे. परंतु, तलाठ्याकडील गाव नमुना आठची यादी अद्यापही ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना मिळालेली नाही. अशात मिळेल त्या कागदावर घाईघाईने कच्चे पंचनामे उरकले जात आहेत. गाव नमुना आठ यादी हातात आल्यावर पक्का पंचनामा तयार होणार आहे. पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. स्वाक्षरीसाठी परत शेतकऱ्यांचे घर कर्मचाऱ्यांना गाठावे लागणार आहे. 

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान असह्य झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. लोकप्रतिनीधी, शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांद्यावर जाऊन तात्काळ मदतीचे आश्‍वासन देत सुटले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्याचा दौरा करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना नुकसानभरपाई मिळणार असे आश्‍वासन दिले.

परंतु, प्रत्यक्षात पंचनाम्यांचा देखावा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍यात समोर आला आहे. सरकारकडून मदतीचे आकडे कोटींच्या घरात सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मदत मिळणार काय? याबाबत शेतकरी साशंक आहेत. 

सर्व नोंद कागदावरच 
गोंडपिपरी तालुक्‍यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून अवघ्या दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचा दबाव ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांच्यावर आहे. पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्यापही गाव नमुना आठची यादी मिळालेली नाही. सर्व्हे नंबर निहाय शेतकरी माहितीच्या आधारावर पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे मिळेल त्या कागदावर कच्चा पंचनामा केला जात आहे. शेतकऱ्याचे नाव, स्वाक्षरी, प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव कागदावर लिहिले जात आहे. 

बळीराजा पुरता गोंधळला 
यादी आल्यानंतर पक्का पंचनामा तयार होणार आहे. पक्‍या पंचनाम्यावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना परत शेतकऱ्यांचे घर गाठावे लागणार आहे. कुठल्याच परस्थितीत दोन दिवसांत कार्यालयात अहवाल सादर करणे कठीण झाले आहे. त्यामुळे धावतपळतच पंचनाम्यांचे सोयस्कार उरकविले जात आहेत. हा सारा प्रकार बघून बळीराजा पुरता गोंधळला आहे. मदत करायची नसेल तर करू नका; परंतु ही नौटंकी बंद करा असे खडेबोल बळीराजा कर्मचाऱ्यांना सुनावित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will register on any paper?