रेल्वेची सुरक्षा यंत्रणा होणार "डोळस'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

नागपूर - "इंटिग्रेटेड सेक्‍युरिटी सिस्टिम‘अंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकावर 200 सीसीटीव्ही लावण्यासाठी अखेर निविदा काढण्यात आली. "सकाळ‘च्या स्टिंग ऑपरेशननंतर रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कामाला लागले आहे. सीसीटीव्हींमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक डोळस होणार आहे. 

नागपूर - "इंटिग्रेटेड सेक्‍युरिटी सिस्टिम‘अंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकावर 200 सीसीटीव्ही लावण्यासाठी अखेर निविदा काढण्यात आली. "सकाळ‘च्या स्टिंग ऑपरेशननंतर रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कामाला लागले आहे. सीसीटीव्हींमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक डोळस होणार आहे. 

"सकाळ‘ने स्टिंग ऑपरेशनद्वारे रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले. सकाळच्या वृत्तमालेनंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर अनधिकृत मार्ग बंद करणे, रेल्वेस्थानकाचा काना-कोपरा सीसीटीव्हीच्या टप्प्यात आणणे, प्रवेशद्वारावर "अंडर व्हेईकल स्कॅनिंग सिस्टीम‘ लावणे, विशेष समितीकडून रेल्वेस्थानकावरील सुरक्षेचे ऑडिट करून घेण्याची ग्वाही प्रशासनातर्फे देण्यात आली होती. टप्प्या-टप्प्याने सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यात येत आहेत. 11 पैकी चार अनधिकृत मार्ग बंद झाले. सुरक्षेचे ऑडिट करून अहवाल सादर करण्यात आला आहे. आता अत्याधुनिक 200 सीसीटीव्ही बसविणे व कार्यान्वित करण्यासाठी विभाग स्तरावर निविदा काढण्यात आली आहे. 

360 डिग्री फिरणारे आणि अंधारातही योग्य प्रकारे चित्रण करण्याची क्षमता असणारे कॅमेरे लावण्यात येतील. आरोपींचे चेहरे यंत्रणेत सेव्ह राहील. संबंधित आरोपी कॅमेऱ्यांच्या टप्प्यात येताच यंत्रणाच त्याबाबतची सूचना देईल. शिवाय रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यालगतच्या रिकाम्या कक्षात नवे अत्याधुनिक स्वरूपाचे नियंत्रण कक्षही तयार केले जाणार आहे. चारचाकी वाहने तपासण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर अंडर व्हेईकल स्कॅनिंग सिस्टम लावण्यात येईल. अत्याधुनिक स्वरूपाची ही यंत्रणा पुण्यातून आणून लवकरच प्रवेशद्वारावर "इन्स्टॉल‘ केली जाणार आहे.

अन्य सहा स्थानकांवर लागणार सीसीटीव्ही
विविध रेल्वेस्थानकांवर महिला सुरक्षेसंदर्भात "इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम‘अंतर्गत उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासाठी निर्भया फंडमधून निधी मिळत आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातील बैतूल, बल्लारशा, वर्धा, धामणगाव, चंद्रपूर, आमला या सहा स्थानकांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावर गरजेनुसार 50 ते 60 सीसीटीव्ही लावण्यात येतील. ही सहा स्थानके आणि नागपूर स्थानकावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी एकत्रित निविदा काढण्यात आली आहे.

- प्रकल्पाचा अपेक्षित खर्च 6.29 कोटी
- निविदा सादर करण्याची मुदत 16 सप्टेंबरपर्यंत
- निविदा उघडण्याची वेळ 16 सप्टेंबर रोजी दुपारनंतर
- यंत्रणा इन्स्टॉल करण्याचा अवधी 6 महिने.

Web Title: Will train protection system "sighted"