आमची थट्टाच करणार का? 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 November 2019

- रुग्णांसह नातेवाईक रस्त्यावरच 
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परिसरातील वास्तव 
- उपचारासाठी रुग्ण व नातेवाईक करतात दोन महिने प्रतीक्षा 
- सकाळच्या चहापासून तर रात्रीचे भोजन तीन विटांच्या चुलीवर 

नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय गरीव व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश आदी ठिकाणांहून रोज रुग्णांची गर्दी होत असते. मात्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्ण व नातेवाईकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रुग्णांसह नातेवाईकांना रस्त्यावरच रात्र काढावी लागत असल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे. 

खासगीतील उपचार गरिबांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. सरकारी दरात उपचार होतात म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बरेच जण मोठ्या आशेने येतात. येथे उपचारासाठी रुग्ण व नातेवाईक महिने दोन महिने प्रतीक्षा करतात. रुग्ण भरती असला तरी नातेवाइकांचा मुक्काम पोस्ट सुपरचा परिसर असतो. सकाळच्या चहापासून तर रात्रीचे भोजन तीन विटांच्या चुलीवर होते. नातेवाइकांसाठी राहण्याची सोय नसल्याने जमिनीवर मोकळ्या आकाशाचे पांघरुण घेऊन नातेवाईक रात्र काढतात. 


उपचाराच्या प्रतीक्षेत असलेले उमरेड येथील देवीदास नेवारे 

नागपुरातील गोंडखैरी परिसरातील हिरालाल यादव. उपचारासाठी आल्यानंतर बाह्यरुग्ण विभागातील गर्दीमुळे त्याला बसायला जागा नाही. तर बाहेर निवारा नाही. यामुळे येथील परिसरात हा रुग्ण पहुडलेला आहे. तर उमरेड परिसरातील देवीदास नेवारे उपचाराच्या प्रतीक्षेत सुपरच्या प्रवेशद्वाराजवळ बसून दिसले. त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही. अशाप्रकारे उपचारासाठी सुपर स्पेशालिटी परिसरात रुग्णांच्या आयुष्याचा खेळ सुरू असतो. डॉक्‍टरांना वारंवार शस्त्रक्रियेसाठी विनंती केली जाते. परंतु "डॉक्‍टर मी आहे की तू?' हे डॉक्‍टरांचे उत्तर. रोजगार बुडतो. औषधासाठी पैसा लागतो. महिना दोन महिन्यांचा मुक्काम असल्याने पैसा आणायचा कोठून, हा प्रश्‍न नातेवाइकांसमोर असतो. 

Image may contain: 1 person, sitting, table and outdoor
व्हरांड्यात पहुडलेले हिरालाल यादव 

घराला ठोकले कुलूप 
"साहेब, धन्याला उपचारासाठी घेऊन आलो जी. लेकरू लहान आहे. लेकरू घरी आहे सासूसोबत. तीन विटा लावून सकाळी स्वयंपाक झाला की, हातमजुरीवर जातो. दिवसभर पती येथे उपचारासाठी सुपरमध्ये असतात. कामावरून आले की, मी त्यांच्याजवळ राहते' ही भावना एका पत्नीने व्यक्त केली. घरधनी सुधारला की परिस्थिती सुधारेल, याच आशेवर या कुटुंबाचे जगणे रस्त्याच्या कडेला सुरू आहे. 

तो निवारा कधी बनेल 
सुपर स्पेशालिटीत नातेवाईकांसाठी कोणताही निवारा नाही. ही बाब "सकाळ'ने प्रकाशात आणली होती. येथील तत्कालीन विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या पुढाकारातून एका स्वयंसेवी संस्थेतर्फे निवारा तयार करून देण्याचे आश्‍वासन मिळाले होते. 54 लाखांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला सादर करण्यात आला होता. परंतु, जागा उपलब्ध करण्यावरून हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will you ridicule us?