पवनसूत डेव्हलपर्सला दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दररोज एक हजार रुपये अतिरिक्त भरपाई द्यावी लागेल, असे डेव्हलपरला सांगण्यात आले आहे.

नागपूर ः ग्राहकाने खरेदी केलेल्या भूखंडाची वर्तमान सरकारी दरानुसारची किंमत अथवा त्यांनी जमा केलेले दोन लाख 88 हजार रुपयांवर 18 टक्के व्याजासह यापैकी जी रक्कम अधिक असेल ती द्यावी, असे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने पवनसूत रियल इस्टेट ऍण्ड लॅन्ड डेव्हलपर्सला दिला आहे.
तक्रारकर्त्यांना ग्राहक मंचाच्या आदेशानुसार दोन लाख 88 हजार रुपयांवर 23 डिसेंबर 2012 ते प्रत्यक्ष रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू होणार आहे. तक्रारकर्तीला शारीरिक-मानसिक त्रासापोटी 20 हजार व तक्रार खर्चापोटी पाच हजार अशी एकूण 25 हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे. ही रक्कमही डेव्हलपरने द्यायची आहे. मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दररोज एक हजार रुपये अतिरिक्त भरपाई द्यावी लागेल, असे डेव्हलपरला सांगण्यात आले आहे.

रजनी तकदीर रामटेके यांनी पवनसूत डेव्हलपर्सच्या बनवाडी येथील ले-आउटमधील एक भूखंड सहा लाख 89 हजार 900 रुपयांत खरेदी केला आहे. यासाठी त्यांनी डेव्हलपर्सला 23 जानेवारी 2012 पर्यंत एकूण दोन लाख 88 हजार रुपये दिलेत. त्यानंतर त्यांनी उर्वरित रक्कम देण्याची तयारी दर्शवीत भूखंडाचे विक्रीपत्र करून मागितले. परंतु, त्यांना कंपनीकडून प्रतिसाद देण्यात आली नाही. त्यांच्या कायदेशीर नोटीसचीही दखल घेण्यात आली नाही. त्यांना त्यांचे पैसेही परत करण्यात आले नाही. परिणामी त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचाने नोटीस बजावल्यानंतर डेव्हलपर्सने लेखी उत्तर दाखल करून तक्रार रद्द करण्याची विनंती केली होती. परंतु, मंचाने कागदोपत्री पुरावे ग्राह्य धरत तक्रारकर्तीला नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wind blows to developers