नागपूरचा पारा नीचांकीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नागपूर : बंगालच्या उपसागरातील फेथाई चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यामुळे विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भाला कडाक्‍याच्या थंडीने कवेत घेतले असून, शहरात प्रथमच पारा दहा अंशांच्या खाली आला. प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारी नोंदविलेले 9.6 अंश किमान तापमान या मोसमातील नीचांकी ठरले. विदर्भातही सर्वांत कमी तापमानाची नोंद नागपुरातच झाली. या आठवड्यात हवेतील गारठा आणखी वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

चक्रीवादळामुळे विदर्भात दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण होते. काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाराही सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी चढला होता. मंगळवारी 15 अंशांवर गेलेला नागपूरचा पारा चोवीस तासांत तब्बल पाच अंशांनी घसरून 9.6 अंश सेल्सिअसवर आला. विदर्भात सर्वांत कमी तापमानाची नोंद नागपुरात करण्यात आली. सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा दोन ते चार अंशांनी खाली आला आहे. उत्तर भारतातील जम्मू-काश्‍मीर, सिमला, कुल्लू-मनाली या पहाडी भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे, या आठवड्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. पारा सहा अंशांपर्यंत घसरण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
तब्येतीची काळजी घेण्याचा डॉक्‍टरांचा सल्ला
वाढती थंडी लक्षात घेता डॉक्‍टरांनी नागरिकांना विशेषत: लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अचानक गारठा वाढल्यामुळे शहरातील ऊनी कपड्यांची विक्रीही वाढली आहे. दोन-तीन दिवसांपासून स्वेटर्स विक्रेत्यांच्या दुकानासमोर खरेदीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वातावरणातील बदलामुळे विविध आजारांनीही डोके वर काढले आहे.

Web Title: winter season news in nagpur city