नागपूर @ 8.6

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नागपूर  : विदर्भात थंडीचा कहर सुरूच असून, उपराजधानीत पाऱ्याने पुन्हा या मोसमातील 8.6 अंश सेल्सिअसचा नवा नीचांक नोंदविला आहे.

नागपूर  : विदर्भात थंडीचा कहर सुरूच असून, उपराजधानीत पाऱ्याने पुन्हा या मोसमातील 8.6 अंश सेल्सिअसचा नवा नीचांक नोंदविला आहे.
उत्तर भारतातील पहाडी भागांत सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीचा प्रभाव दोन-तीन दिवसांपासून विदर्भात तीव्रतेने जाणवतो आहे. बुधवारी 9.6 अंशांपर्यंत घसरलेला नागपूरचा पारा आणखी एका अंशाने खाली येऊन 8.6 अंशांवर स्थिरावला. प्रादेशिक हवामान विभागाने येथे नोंदविलेले किमान तापमान या मोसमातील आणि विदर्भातीलही नीचांकी ठरले. यवतमाळ (9.4 अंश सेल्सिअस), ब्रम्हपुरी (9.9 अंश सेल्सिअस), चंद्रपूर (10.2 अंश सेल्सिअस), अकोला (10.2 अंश सेल्सिअस), अमरावती (10.6 अंश सेल्सिअस), बुलडाणा (10.8 अंश सेल्सिअस), वर्धा (10.9 अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका दिसून आला. केवळ पहाटे किंवा रात्रीच्या सुमारासच नव्हे, दिवसादेखील बोचरी हवा वाहू लागली आहे. उत्तरेकडून येणारे थंडगार वारे लक्षात घेता वैदर्भींची सध्या तरी थंडीपासून सुटका होणे नाही. वातावरणातील गारठा आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज, संकेत हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
पचमढीत पारा दोन अंशांवर
थंडीची लाट केवळ विदर्भातच नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह मध्य भारतातील इतरही राज्ये कडाक्‍याच्या थंडीने प्रचंड त्रस्त आहेत. राज्यात गुरूवारी सर्वात कमी तापमानाची नोंद अहमदनगर येथे (6.4 अंश सेल्सिअस) करण्यात आली. तर, मध्य प्रदेशातील पचमढी येथे पारा तब्बल दोन अंशांपर्यंत घसरला आहे. याशिवाय खजुराहो (2.4 अंश सेल्सिअस), दतिया (3.6 अंश सेल्सिअस), ग्वाल्हेर (4 अंश सेल्सिअस), बैतुल (4.5 अंश सेल्सिअस) आणि उज्जैन (4.8 अंश सेल्सिअस) येथेही थंडीने प्रचंड कहर जाणवला.

Web Title: winter season news in nagpur city