पावसाळीपाठोपाठ हिवाळी अधिवेशनही नागपुरात?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नागपूर - मुंबईतील आमदारांचे निवासस्थान ‘मनोरा’ पाडण्यात येणार असल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पाठोपाठ हिवाळी अधिवेशनसुद्धा नागपूरमध्ये होण्याची शक्‍यता आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी भाजपला वैदर्भीयांना खूष करण्याची संधी मिळणार आहे. 

नागपूर - मुंबईतील आमदारांचे निवासस्थान ‘मनोरा’ पाडण्यात येणार असल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पाठोपाठ हिवाळी अधिवेशनसुद्धा नागपूरमध्ये होण्याची शक्‍यता आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी भाजपला वैदर्भीयांना खूष करण्याची संधी मिळणार आहे. 

संयुक्त महाराष्ट्रात समावेश झाला तेव्हा वैदर्भीयांवर अन्याय होऊ नये याकरिता एक अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा करार झाला होता. त्यानुसार नित्यनेमाने हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात येते. मात्र एखाददोन वर्षांचा अपवाद वगळता हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांच्यावर चालले नाही. केवळ अधिवेशनाची औपचारिकता पार पाडली जाते. गोंधळ घालून वेळ मारून नेला जातो, अशी भावना वैदर्भीयांची झाली आहे. सातत्याने होणारा अन्याय आणि असमतोल विकासामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरू लागली आहे. वैदर्भीयांचा रोष शमवण्यासाठी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा प्रयत्न भाजपतर्फे सुरू आहे. शिवसेनेचा यास विरोध आहे. 

चार जुलैपासून प्रारंभ
पावसाळ्यात मुंबईत जोरदार पाऊस पडतो, अनेक अडचणी उद्‌भवतात तसेच हिवाळी अधिवेशन शेवटचे असल्याने विदर्भाला फारसे काही देता येत नसल्याची सबब भाजपने पुढे केली आहे. ती जवळपास मान्य झाली आहे. अधिवेशनाच्या तयारीला लागण्याचे तोंडी निर्देशही सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. त्यानुसार चार जुलैपासून अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. 

एका दगडात दोन पक्षी 
मुंबईतील आमदार निवास असलेली ‘मनोरा’ धोकादायक इमारत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मध्यंतरी एका आमदाराच्या खोलीतील पीओपी कोसळले होते. 

त्यामुळे मनोरा पाडून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन मॅजेस्टिक इमारतही जुनी झाली आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईत घेतल्यास आमदारांच्या राहण्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. अधिवेशन काळात सर्वांची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्याची तयारी सरकारने दर्शवली होती. त्याकरिता प्रत्येकी एक लाख रुपये खर्च दिला जाणार होता. मात्र कार्यकर्त्यांचा खर्च कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

त्यांचा खर्च करण्याची तयारी सरकारची नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरला हलविण्याचा विचार सरकारचा सुरू आहे. पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपुरात घेऊन भाजप एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जाते.

अधिवेशनाच्या तयारीसाठी आज बैठक
 नागपुरात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी मंगळवारी (ता. ८) सायंकाळी पाच वाजता बैठक बोलविली आहे. यंदा पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. ४ जुलैपासून अधिवेशन सुरू होणार असून, तशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी हजारो अधिकारी व कर्मचारी नागपुरात दाखल होतील. हिवाळी अधिवेशन साधारणत: दोन आठवडेच चालत असे. पावसाळी अधिवेशन तीन ते चार आठवडे चालते. त्यादृष्टीने तयारी करावी लागणार आहे. यासाठी विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवास, हैदराबाद हाऊस सज्ज करावे लागणार असून, देखभाल दुरुस्ती करावी लागणार आहे.

Web Title: winter session in nagpur