थंडी उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

- दहा दिवसात गारठणार जिल्हा
- पारा 10 अंशाखाली जाण्याची शक्यता
- 15 डिसेंबर ते 15 जानेवारी कोल्ड वेव्ह
- ऋतुचक्रातील बदलामुळे वातावरणातही आमुलाग्र बदल

अकोला ः गत आठवड्यापर्यंत अकोलेकरांना पावसात चिंब व्हावे लागल्याने, हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा स्पर्श अजूनपर्यंत जाणवला नाही. आता मात्र पावसाचे सावट दूर झाले आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसात पारा 10 ते 12 अंशापर्यंत घसरून, जिल्हा गारठण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

एरव्ही दसऱ्यापासून, फार फार तर कोजागीरी पोर्णिमेपासून हिवाळ्यातील गारवा जाणवायला लागतो. यंदा मात्र दसरा आणि दिवाळीसुद्धा पावसातच गेली असून, आॅक्टोबर अखेरपर्यंत पावसाने अकोलेकरांना झोडपले. यावर्षी उन्हाळा तसेच पावसाळाही चांगलाच लांबला. ऋतुचक्रातील या बदलामुळे वातावरणातही आमुलाग्र बदल होऊन, आद्रता, कमाल-किमान तापमान, दमटपणा, थंडी आणि हवेच्या प्रवाहात बराच फरक जाणवला.

मॉन्सूनचे आगमनही जवळपास महिनाभर उशिरा झाले. परंतु, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते आॅक्टोबर अखेरपर्यंत पावसाने सततची हजेरी लावल्याने, अतिवृष्टीची जिल्ह्यात नोंद झाली. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान केले मात्र, जलप्रकल्प फुल्ल होऊन जमिनीलाही चांगली ओल मिळाली आहे. त्यामुळे अजूनपर्यंत वातावरणात कोरडेपणा येऊ शकला नाही. याचाच परिणाम म्हणून 11 नोव्हेंबर रोजी सुद्धा जिल्ह्यात सरासरी 80 टक्क्यांपर्यंत आद्रता नोंदली.

मात्र महाराष्ट्राच्या वरच्या भागातील राज्यामध्ये बर्फवृष्टी सुरू झाल्याने, राज्यासह जिल्ह्यातील व विदर्भातील तापमानात घसरण व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आठवडाभरातच जिल्ह्यासह वऱ्हाडात थंडीची चादर पसरली जाणार असून, 20 नोव्हेंबरपर्यंत गारठून टाकणाऱ्या आणि गुलाबी थंडीचा अनुभव अकोलेकरांना येऊ शकतो.

...म्हणजे हिवाळा सुरू झाला
एरव्ही आॅक्टोबर पासून हिवाळ्याला सुरुवात होत असल्याचे सांगितले जाते. परंतु, दवं बिंदू पडायला सुरुवात होणे, ओठ, त्वचा फाटणे, तेल गोठणे आणि धुके पडायला लागणे, म्हणजे खऱ्या अर्थाने हिवाळा सुरू झाला, असे म्हटले जाते. सध्या ही स्थिती अकोल्यामध्ये जाणवायला लागली असल्याने, आता हिवाळ्याला खरी सुरुवात झाली, असे म्हणायला हरकत नाही.

15 डिसेंबर ते 15 जानेवारी कोल्ड वेव्ह
येत्या दोन आठवड्यात तापमानात चांगलीच घसरण होऊन गुलाबी थंडी जाणवेल. परंतु, 15 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान कोल्ड वेव्ह येऊन कडाक्याच्या थंडीचा सामना अकोल्यासह वैदर्भियांना कारवा लागू शकतो. या दिवसात चार ते पाच अंशाखाली पारा जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

यावर्षी उशिरापर्यंत पाऊस पडल्याने, जमीन ओली आहे. जलप्रकल्प सुद्धा फुल्ल झाले आहेत. याचा परिणाम वातावरणातील आद्रतेवर होतो आणि आद्रता अधिक असताना थंडी पडल्यास दाट धुक्याची चादर पसरते. त्यामुळे पुढील काही दिवसात दाट धुके पाहायला मिळू शकते तसेच ‘दवं’ पडण्याचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. येत्या दहा दिवसात पारा 10 ते 12 अंशाखाली जाण्याची शक्यता असून, डिसेंबच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्ड वेव्हचा सामना करावा लागू शकतो.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: winter starts at Akola soon