शेतात वीज पडून महिलेचा मृत्यू ; पाच मजूर जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून सविता पुटकी जागीच मृत्यूमुखी पडल्या. त्यांच्या मागे दोन वर्षीय मुलगी रोशनी व पाच वर्षीय मुलगा सुजल अशी दोन मुले आहेत. मात्र, नियतीने सविताला त्यांच्यापासून दूर नेल्याने मुले पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

करंजी रोड (जि. यवतमाळ) : येथून जवळच असलेल्या दहेगाव शिवारातील नालाई पोड येथे कपाशीची सरकी टोबण्याचे काम करणार्‍या शेतमजुरांवर वीज पडली. त्यात एक महिलेचा मृत्यू झाला तर पाच मजूर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता.21) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

सविता अनिल पुटकी (वय 30, रा. नागाई पोड ता. राळेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींमध्ये वाल्मिक राजेराम पुटकी, वनिता वसंता जांभूळकर (वय 32), इंदू वाल्मिक पुटकी, निर्मला नागोराव पुटकी, ललिता नोगाराव पुटकी (सर्व रा. नागाई पोड ता. राळेगाव) यांचा समावेश आहे. वरील सर्व जण शेतकरी वाल्मिक राजेराम पुटकी यांच्या शेतात सरकी बियाणे टोबण्याचे काम करीत होते. स्वत: वाल्मिक पुटकी सारे पाडीत होते. त्यांच्या बाजूच्याच शेतात सुधाकर कवडू रामपुरे हेदेखील सारे पाडीत होते, तर प्रशांत सुधाकर रामपुरे, सुनंदा सुधाकर रामपुरे, कीर्तन सुधाकर रामपुरे हे कपाशीचे बी टोबत असताना पाचच्या सुमारास आभाळ भरून आले व पावसाला सुरवात झाली. त्यातच अचानकपणे वीज कोसळून सविता अनिल पुटकी ही जागीच ठार झाली. गंभीर जखमी वनिता वसंता जांभूळकरला यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इंदू वाल्मिक पुटकी, निर्मला नागोराव पुटकी, ललित नागोराव पुटकी यांना दहेगाव येथील रुग्णालयात, तर प्रशांत सुधाकर रामपुरे याला करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

मुले झाली पोरकी 

शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून सविता पुटकी जागीच मृत्यूमुखी पडल्या. त्यांच्या मागे दोन वर्षीय मुलगी रोशनी व पाच वर्षीय मुलगा सुजल अशी दोन मुले आहेत. मात्र, नियतीने सविताला त्यांच्यापासून दूर नेल्याने मुले पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Woman dies and Five laborers injured