esakal | कोरोनामुक्त होऊनही करते ती लोकांच्या टोमण्यांचा सामना; कुटुंबालाही केले बहिष्कृत... 
sakal

बोलून बातमी शोधा

corona free

जेव्हा महिला किंवा घरातील इतर सदस्य काही कामानिमित्त घराबाहेर पडले, तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलून गेला. ती महिला दिसताच लोकं आपला रस्ता बदलायला लागले. बाहेर का फिरतेस? तू कोरोना पॉझिटिव्ह आहे. आम्हाला मारायला बाहेर निघाली का? अशा असह्य शब्दांचा मारा तिला दररोज सहन करावा लागतो.

कोरोनामुक्त होऊनही करते ती लोकांच्या टोमण्यांचा सामना; कुटुंबालाही केले बहिष्कृत... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदगावपेठ (अमरावती)  : दीड महिन्यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्या वतीने अप्रत्यक्षरीत्या बहिष्कार टाकण्यात आल्याची खळबळ उडवून देणारी घटना येथे उघडकीस आली. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तब्बल एक महिना स्वतःहून होम क्वारंटाइन राहूनसुद्धा आता ती महिला किंवा कुटुंबीय घराबाहेर निघाल्यानंतर त्यांना लोकांच्या हीन भावनेचा सामना करीत शाब्दिक मारासुद्धा सहन करावा लागत आहे. 

संबंधित महिला पती व मुलासह अनेक वर्षांपासून नांदगावपेठ येथे वास्तव्यास असून संघर्षमय जीवन जगत आहेत. स्थानिक खासगी रुग्णालयात ते काम करतात. दीड महिन्यापूर्वी ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. उपचारानंतर ती महिला गावात आली तेव्हा अनेकांनी तिला व तिच्या कुटुंबातील सदस्यांना वास्तव्यास असलेला परिसर सोडून इतरत्र कोठेही क्वारंटाइन राहण्यासाठी दबाव आणला. सुरुवातीला महिलेच्या पतीला आणि मुलाला सरपंच दिगंबर आमले यांनी सहारा दिला.

सविस्तर वाचा - पाहुणा म्हणून आलेल्या आतेभावाने केला बलात्कार...

महिला कोरोनामुक्त झाल्यानंतर येथील नागरिक सुभाष राऊत यांनी त्या कुटुंबाला स्वतःच्या घरात आसरा दिला. एक महिना स्वतः आणि कुटुंबीय होमक्वारंटाइन राहिले. मात्र, जेव्हा महिला किंवा घरातील इतर सदस्य काही कामानिमित्त घराबाहेर पडले, तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलून गेला. ती महिला दिसताच लोकं आपला रस्ता बदलायला लागले. बाहेर का फिरतेस? तू कोरोना पॉझिटिव्ह आहे. आम्हाला मारायला बाहेर निघाली का? अशा असह्य शब्दांचा मारा तिला दररोज सहन करावा लागतो. महिला ऑटोमध्ये बसली तर इतर प्रवासी तिला पाहून त्या ऑटोमध्ये बसणे टाळतात. त्यामुळे तिचे कुटुंबीय त्रस्त झाले आहे. 

अवश्य वाचा- काय, मेटॅडोर झाडावर चढला! होय हे खरे आहे... 

दररोज येतो आत्महत्येचा विचार 

संघर्ष करीत संसाराचा गाडा ओढत आहे. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आहे तरीही घराबाहेर निघाल्यानंतर काही लोक टोमणे मारतात. नको ते शब्द जेव्हा कानावर पडतात, तेव्हा मनात आत्महत्येचा विचार येतो, असे त्या महिलेने सांगितले. 

त्या महिलेची आणि तिच्या कुटुंबीयांची प्रकृती ठणठणीत आहे. कोरोनाचे कुठलेही लक्षण त्यांच्यात नाही. अशाप्रकारे बहिष्कृत भावना बाळगणे अत्यंत चुकीचे आहे. 
-डॉ. रवींद्र शिरसाठ, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र माहुली जहागीर. 

कोरोनामुक्त झाल्यानंतरही नागरिकांनी महिलेला अशाप्रकारे बहिष्कृत वागणूक देणे गुन्हा आहे. महिलेने नावानिशी तक्रार दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
-गोरखनाथ गांगुर्डे, पोलिस निरीक्षक, नांदगावपेठ. 

loading image
go to top