देशी दारू दुकानावर महिलांचा ‘हल्लाबोल’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

संतापलेल्या महिलांनी ‘हल्लाबोल’ करून दुकान मालकाला बेदम मारहाण केली आणि दुकानातील दारूच्या बाटल्यांची तोडफोड केली. 

नागपूर - कळमना पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिखली देवस्थानाच्याजवळ असलेल्या एका देशी दारूच्या दुकानाच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या. दारू दुकानाच्या विरोधात तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी ‘हल्लाबोल’ करून दुकान मालकाला बेदम मारहाण केली आणि दुकानातील दारूच्या बाटल्यांची तोडफोड केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश गुलाबराव तायवाडे (४०, रा. भवानीनगर, पारडी) यांचे कळमना हद्दीतील चिखली देवस्थान येथे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानासमोर दारुडे आणि टारगट मुलांची नेहमी गर्दी असते. ते महिला, युवती आणि शाळकरी मुलींवर शेरेबाजी, रस्ता अडवणे, शिट्या मारणे असे प्रकार करतात. या दुकानाच्या विरोधात परिसरातील महिलांनी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. उल्लेखनीय म्हणजे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनीही या दारू दुकानाच्या विरोधात पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. परिसरातील महिलांचा या दारू दुकानाच्या विरोधात प्रचंड रोष आहे. या दुकानामुळे परिसरातील शांतता भंग होत असल्याचा संतप्त महिलांचा आरोप आहे. यामुळे परिसरात शिवीगाळ, मारहाणीच्या घटना वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे परिसरातील महिला संतप्त असताना त्यांनी १६ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास प्रकाश तायवाडे हे दुकानात बसलेले होते. या दरम्यान वस्तीत राहणाऱ्या अलका मेश्राम व इतर २० ते २५ महिलांनी त्यांच्या दुकानात घुसून त्यांना बेदम मारहाण केली व तोडफोड करून अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

पोलिसांच्या भूमिकेवर संशय
दारूचे दुकान रात्री उशिरापर्यंत सुरू असते तसेच दुकानासमोरच दारुड्यांनी हातठेल्यांवर मिनीबार सुरू केला आहे. प्लॅस्टिकचे ग्लास आणि पाणी दारुड्यांना रस्त्यावरच पुरविण्यात येते. दुकानमालकाचे काही पोलिस कर्मचाऱ्यांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्यामुळे पोलिसांचेही दुकानाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे कळमना पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

Web Title: Women attacked on liquor shop