महिलांनी उद्‌ध्वस्त केल्या 26 दारूभट्ट्या 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 December 2019

धानोरा शहरालगत वाहणाऱ्या कठाणी नदी परिसरात छापासत्र राबवून धानोरा येथील वॉर्ड क्रमांक 8, 10 व 11 मधील मुक्तिपथ मोहल्ला संघटनेच्या महिलांनी दारूच्या तब्बल 26 भट्ट्या उद्‌ध्वस्त केल्या. 70 माठ मोहसडवा यावेळी महिलांनी नष्ट केला. सोबतच दारूचे काही अड्डेही जाळून नष्ट केले. 

गडचिरोली : धानोरा शहर दारूमुक्त करण्याचा विडा येथील मुक्तिपथ मोहल्ला संघटनेच्या महिलांनी उचलला आहे. दारूविक्रीबंदीचा ठरावही घेतला आहे. शहराला लागून असलेल्या कठाणी नदीलगतच्या जंगलात अनेकजण दारू गाळून शहरात व आसपासच्या गावांमध्ये त्याची विक्री करतात. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. 

या दारूभट्ट्या व शहरात होणारी दारूविक्री बंद करण्याची मागणी काहीच दिवसांपूर्वी महिलांनी पोलिस निरीक्षक अहिरे यांना निवेदनातून केली होती. शहर पोलिसांचेही यासाठी त्यांना सहकार्य मिळाले. मात्र, दारू गाळणाऱ्यांनी जंगलात पळ काढला. 

मोहसडवा नष्ट केला 

सोबतच नदीलगत असलेल्या दारूभट्ट्या शोधून काढण्याचा चंग महिलांनी बांधला होता. शुक्रवारी नदी व जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली असता, मडक्‍यांमध्ये गाडून ठेवलेला मोहसडवा महिलांना सापडला. तब्बल 70 मडकी मोहसडवा बाहेर काढून महिलांनी व मुक्तिपथ तालुका चमूने तो नष्ट केला. यावेळी काहीजण दारू गाळत होते. महिलांना पाहून त्यांनी जंगलात पळ काढला. अशा तब्बल 26 दारूभट्ट्या महिलांनी उद्‌ध्वस्त केल्या. 

अवश्‍य वाचा : ते क्रिकेट ट्रॉफी जिंकून भरधाव जात होते, अन्‌ झाले अघटित...

दारू गाळण्याचे साहित्य जप्त 

दारू गाळण्यासाठी वापरात येणारे जर्मनचे हंडे जप्त केले. गाळलेली दारू नष्ट केली. महिलांच्या या कृतीमुळे शहरातील दारूविक्रेत्यांचे व गाळणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. धानोरा शहरातील महिलांनी केलेली ही पहिलीच मोठी अहिंसक कृती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The women destroyed 26 darubhattya at gadchiroli