स्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

शेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत:ला जाळून घेत जीवनयात्रा संपवली. सदर घटना बुधवारी (ता.14) रात्री घडली असून, आज (ता.15) ती उघडकीस आली. 

शेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत:ला जाळून घेत जीवनयात्रा संपवली. सदर घटना बुधवारी (ता.14) रात्री घडली असून, आज (ता.15) ती उघडकीस आली. 

चिखली तालुक्यातील सहा ते साठ हजार लोकसंख्या असलेल्या धोत्रा भनगोजी गावाच्या 1995 मध्ये सरपंच राहिलेल्या आशाताई इंगळे यांच्या पतीचे निधनानंतर दोन मुलांसह साडेतीन एकर शेतीत उदरनिर्वाह करत होत्या. यादरम्यान त्यांनी दोन मुलांचे शिक्षण व एका मुलीचे लग्न मोठ्या धैर्याने केले. परंतु, हे करत असताना त्यांचेवर नातेवाइकांचे तसेच जिल्हा सहकारी बँकेचे 80 हजारांचे कर्ज झाले. यंदा उत्पादन खर्च भरून निघेल एवढेही उत्पन्न शेतीत झाले नाही. त्यामुळे येत्या काळात नातेवाइकांची देणी आणि बँकेचे असलेले कर्ज कसे द्यावे या विवंचनेतुन त्यांनी स्वत:च्या गोठ्यात रात्रीच्या वेळी स्वत:चे सरण रचून जाळून घेतले. यावेळी गावकरी तसेच शेजारी राहत असलेल्या ग्रामस्थांना गोठ्यात आग लागल्याचे दिसून आल्याने त्यांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली असता त्यांना आगीत आशाताई इंगळे याचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. सदर घटनेची माहिती अमडापूर पोलिस स्टेशनला दिल्यानंतर आज (ता.15) सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.

एकाच महिन्यातील दुसरी घटना
काही दिवसांपूर्वीच याच गावातील एका तरुण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नैराश्य वाढत असल्याची भावना अधोरेखित होत आहे. यावर शासकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे गावकर्‍यांकडून बोलले जात आहे.

जिल्ह्यातील दुसरी घटना
गेल्या चार महिन्यापूर्वी सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील 39 वर्षीय युवा शेतकरी गजानन अर्जुन जायभाये यांनी कर्जमाफीच्या यादीत नाव नसणे आणि बियाणांची जुळवाजुळव पाहता स्वत:च्या शेतात 29 जुलै 2018 ला सरण रचून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. सततची नापिकी व वाढते कर्ज यामुळे शेतकर्‍यांचे मनौधर्य खचत असून, दुष्काळाची त्यामध्ये अधिकच भर पडत असल्याने जिल्ह्यात दुसर्‍या शेतकर्‍याने सरण रचून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

Web Title: Women farmer suiciede