कुरमाघरात महिलांना सतावते सुरक्षेची चिंता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

गडचिरोली : अंधश्रद्धेमुळे गेल्या आठवड्यात धानोरा तालुक्‍यातील पौणी गावात गर्भवती महिलेचा कुरमाघरात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता भामरागड तालुक्‍यातील गुंडूरवाहू येथे कुरमाघरात साप चावल्याने एका युवतीचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता.23) सकाळी मृत्यू झाला. सुरक्षेचा अभाव आणि सोयीसुविधांची कमतरता यामुळे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेऊन कुरमाघरांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

बेबी लालसू कोरसामी (वय 18 ) असे मृत युवतीचे नाव आहे. तिला मासिक पाळी आल्याने ती कुरमाघरात होती. सोमवारी (ता.22) रात्री झोपेत तिला विषारी सापाने दंश केला. तिला भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आदिवासी समाजात मासिक पाळी आलेल्या महिलांना कुरमाघरात ठेवले जाते. मात्र, तेथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसतात. त्यात साप, विंचूने दंश केल्याच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. धानोरा तालुक्‍यातील लेखामेंढा गाव वगळता जिल्ह्यात कुठेही आदिवासी गावामध्ये सोयीसुविधा असलेले पक्के कुरमाघर नाही. त्यामुळे येथे राहणाऱ्या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन मुलींच्या जन्मानंतर तिसरीही मुलगी असल्याच्या कारणावरून गरोदर अवस्थेत पौणी येथील शांता किरंगे या महिलेला कुरमाघरात ठेवले होते. तिचा गावठी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. धानोरा तालुक्‍यात काही गावांमध्ये यासंदर्भात ग्रामसभांनी जनजागृती करून स्वच्छ व सुंदर कुरमाघर बनवण्याचा संकल्प केला. परंतु प्रत्यक्षात आजही आदिवासी गावांमध्ये रूढी परंपरेनुसार महिलांना कुरमाघरात ठेवले जात असल्याने महिला व युवतींच्या जीविताला धोका तसेच आरोग्याची समस्या भेडसावत आहे.
सामाजिक चिंतन होणे गरजेचे
मासिक पाळी येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे आदिवासी महिलांना कुरमाघरात ठेवणे ही प्रथा आता बंद झाली पाहिजे. मासिक पाळीदरम्यान महिलांना विश्रांती मिळावी, तिचे आरोग्य चांगले राहावे, हा यामागचा हेतू असला तरी कुरमाघरे सुरक्षित नाहीत तेथे सोयीसुविधांची कमतरता असते. साप, विंचू, वन्यप्राणी यांचाही धोका असतो. याशिवाय अन्य घटनाही नाकारता येत नाही. त्यामुळे या गंभीर विषयावर सामाजिक चिंतन होणे गरजेचे आहे, असे मत गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्त्या कुसुम आलाम यांनी व्यक्त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women feels unsafe in Kurmaghar