रणरागिणींनी घडवली दारू विक्रेत्यांना अद्दल! दारूसाठा जप्त करत दिले पोलिसांच्या ताब्यात 

मिलिंद उमरे 
Thursday, 8 October 2020

दारूमुक्त गाव म्हणून बोदली या गावाची ओळख होती. मात्र मागील 5 महिन्यांपासून गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते. इतर ठिकाणाहून दारू आणून गावात विक्री केली जात आहे. तर काही दारू विक्रेते गावातच दारू गाळतात.

गडचिरोली : तालुक्‍यातील बोदली येथील महिलांनी अहिंसक कृती करीत दोन दारूविक्रेत्यांना दारूची विक्री करताना पकडले. याबाबतची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही दारू विक्रेत्यांकडील एकूण 20 लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. याप्रकरणी अशोक श्‍यामराव कुकुडकर, राजू यादव पिपरे या दोन्ही दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारूमुक्त गाव म्हणून बोदली या गावाची ओळख होती. मात्र मागील 5 महिन्यांपासून गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते. इतर ठिकाणाहून दारू आणून गावात विक्री केली जात आहे. तर काही दारू विक्रेते गावातच दारू गाळतात.

याचे दुष्परिणाम दिसताच गाव संघटनेच्या महिलांनी पुढाकार घेत दारूमुक्त गावाची ओळख पुन्हा मिळविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील प्रत्येक दारूविक्रेत्याच्या दारावर जाऊन दारूविक्री न करण्याची समज देण्यात आली. तरीसुद्धा गावातील काही मुजोर दारूविक्रेत्यांनी विक्री सुरूच ठेवली. 

ठळक बातमी - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

त्यामुळे त्रस्त महिलांनी गडचिरोली पोलिस स्टेशन गाठून गावातील दारूविक्री बंद करण्याची निवेदनातून मागणी केली. गावातील तळ्याच्या पाळी लगत दारू विक्री सुरू असल्याची माहिती गाव संघटनेच्या महिलांना मिळताच अहिंसक कृती करीत दोन दारू विक्रेत्यांना रंगेहाथ पकडले. घटनास्थळावर गडचिरोली पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दोन्ही दारूविक्रेत्यांकडून एकूण 20 हजारांची हातभट्टीची दारू जप्त करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

महिलांच्या पुढाकारातून दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल झाल्याने इतर दारूविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील भेसरकर व त्यांच्या पथकाने केली. यावेळी मुक्तिपथ तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.

गट्टानेली येथे क्‍लिनिक

धानोरा तालुक्‍यातील गट्टानेली येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे एकदिवसीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील व्यसनी रुग्णांनी शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला. एकूण 17 रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आला.

हेही वाचा - व्हॉट्सॲप ग्रुपवर कमेंट करणे जीवावर बेतले; घरात घुसून युवकाचा खून

दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्‌भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्‍यक आहे. ही बाब लक्षात घेऊन दारू सोडण्यास इच्छुक रुग्णांनी शिबिराला भेट दिली. एकूण 18 रुग्णांची नोंदणी करून 17 रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आला.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women in Gadchiroli district caught wine dealers with help of police